धक्कादायक ! राज्यात अपघाती मृत्यूंचा सर्वाधिक दर नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:10 AM2021-11-02T07:10:00+5:302021-11-02T07:10:01+5:30
Nagpur News २०२० हे वर्ष कोरोनासोबतच नागपूरकरांसाठी अपघातांच्या बाबतीतदेखील अतिशय दुर्दैवी ठरले. वर्षभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये बावीसशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.
योगेश पांडे
नागपूर : २०२० हे वर्ष कोरोनासोबतच नागपूरकरांसाठी अपघातांच्या बाबतीतदेखील अतिशय दुर्दैवी ठरले. वर्षभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये बावीसशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. मुंबई, पुणे या शहरांत वाहतुकीची मोठी समस्या आहे. मात्र, राज्यात अपघातांचा सर्वाधिक दर नागपुरात होता. तर, नागपूरचा अपघाती मृत्यूदर देशात तिसरा होता. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जाहीर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०२० मध्ये नागपूर शहरात विविध अपघातांमध्ये २ हजार २५८ नागरिकांचा बळी गेला. एकूण मृत्यूंपैकी ४.५ टक्के मृत्यू अपघातांमुळेच झाले होते. लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ९०.३ इतका होता व हा दर मुंबई, पुण्याहूनदेखील अधिक होता. मुंबईचा अपघाती मृत्यूदर २८.४ तर पुण्याचा दर ५१.५ इतका होता. दोन जणांचे मृत्यू नैसर्गिक अपघातांमुळे झाले. मरण पावलेल्यांमध्ये १ हजार ७७९ पुरुष व ४७९ महिलांचा समावेश होता. २०१९ साली अपघाती मृत्यूंचा एकूण आकडा २ हजार ११३ इतका होता. ‘लॉकडाऊन’मुळे लोक काही महिने घरी असतानादेखील अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले. राष्ट्रीय पातळीवर रायपूर व राजकोटनंतर नागपुरातील मृत्यूदर सर्वाधिक ठरला. या अपघातांमध्ये केवळ रस्ते अपघातच नसून विजेचा शॉक किंवा त्यासारख्या प्राणांतिक घटनांचा समावेश आहे.
तरुणांचे सर्वाधिक मृत्यू
वर्षभरात विविध अपघातांमध्ये १८ ते ४५ या वयोगटांतील नागरिकांचे सर्वांत जास्त मृत्यू झाले. तरुणांच्या मृत्यूची संख्या ९४५ इतकी होती. एकूण अपघाती मृत्यूंच्या तुलनेत हा आकडा ४१.८५ टक्के इतका होता. १८ वर्षांखालील ८२ जणांचा मृत्यू झाला. तर ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचा आकडा ४१७ इतका होता. ४५ ते ६० या वयोगटांतील ७१४ जणांचा विविध अपघातांमध्ये जीव गेला.
वयोगट - पुरुष - महिला
० ते १४ -२९ - २०
१४ ते १८ - २३- १०
१८ ते ३० - २९३ - ६३
३० ते ४५ - ४८४ - १०५
४५ ते ६० - ५९० - १२४
६० हून अधिक - २६० -१५७
वर्षनिहाय अपघाती मृत्यू
वर्ष - मृत्यू
२०१८ - २,३९४
२०१९ - २,११३
२०२० - २,२५८
राज्यातील मृत्यूदर
शहर - मृत्यूदर
मुंबई- २८.४
पुणे- ५१.५
नागपूर - ९०.३
नाशिक - ५२.१
देशपातळीवर सर्वाधिक मृत्यूदराची शहरे
शहर - मृत्यूदर
रायपूर - ९२.१
राजकोट - ९०.८
नागपूर - ९०.३