धक्कादायक! नागपुरात नऊ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:22 AM2018-12-03T10:22:44+5:302018-12-03T10:25:08+5:30
नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शेजारच्या आरोपीने पाशवी बलात्कार केला. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शेजारच्या आरोपीने पाशवी बलात्कार केला. शेजारच्या एका महिलेने पीडित महिलेचा विश्वासघात करून आपल्या घरात बोलविले आणि आरोपीला बलात्कार करण्यासाठी मदत केली. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याची मदत करणाऱ्या महिलेची चौकशी सुरू आहे.
सोनेगाव वस्तीशेजारी असलेल्या सहकारनगरातील रेल्वेच्या खाली जागेत एक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत आरोपी छोटू ऊर्फ मद्रासी मेश्राम (वय ४२) राहतो. बाजूलाच मीराबाई (वय ५६) नामक आरोपी महिला राहते. ती आणि आरोपी मद्रासी मेश्राम या दोघांमध्ये मैत्री आहे. ते मातीगोट्याचे काम करतात. रात्री एकत्र बसून दारू पितात. महिनाभरापूर्वी कळमेश्वरहून रोजगाराच्या शोधात आलेले एक दाम्पत्य या झोपडपट्टीत राहायला आले. पीडित महिला (वय २०) नू महिन्यांची गर्भवती आहे. तिचा पती रंगरंगोटीचे काम करतो. शनिवारी सकाळी तो कामावर निघून गेला. दुपारी २.३० वाजता गर्भवती महिला झोपड्यात एकटी असल्याचे पाहून आरोपी महिला मीराबाईने तिला आपल्या घरात बोलविले. तिच्याशी औपचारिक चर्चा करीत असतानाच आरोपी मद्रासी मेश्राम झोपड्यात आला. त्यानंतर मीराबाई बाथरूमला जाते, असे सांगून घराबाहेर आली आणि तिने आपल्या झोपड्याचे दार बाहेरून लावून घेतले. आरोपी मद्रासी मेश्रामने गर्भवती महिलेवर बलात्कार केला. तो तिकडे कुकृत्य करीत असतानाच महिलेचा पती दुपारच्या जेवणासाठी कामावरून घरी परतला. पत्नी घरी नसल्याचे पाहून तो मीराबाईच्या झोपड्याकडे आला. तो दाराच्या फटीतून डोकावून पाहू शकतो, हे ध्यानात आल्याने बाजूला लपून बसलेल्या मीराबाईने त्याला मागून दगड फेकून मारला. डोक्याला दगड लागल्याने तो किंचाळला तर, पतीचा आवाज आल्याने आतमध्ये मद्रासीच्या तावडीत असलेल्या महिलेनेही मदतीसाठी आरडाओरड केली. पत्नी आतमध्ये असल्याचे लक्षात आल्यामुळे तिच्या पतीने मीराबाईच्या झोपड्याचे दार उघडले. तेव्हा आरोपी मद्रासी मेश्राम तेथून पळून गेला.
पत्नीची अवस्था बघून पतीने शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मेश्रामला ताब्यात घेतले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मीराबाई मात्र पळून गेली. रविवारी सकाळी तिला पोलिसांनी शोधले. वृत्त लिहिस्तोवर तिची चौकशी सुरू होती.
परिसरात संताप
या घटनेची वार्ता कळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येत नागरिक झोपडपट्टीत जमा झाले. काहींनी मीराबाईच्या झोपड्याला तोडण्याचीही भाषा वापरली. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. वेळीच पोलीस पोहोचल्याने अप्रिय घटना टळली.