कोरोनालागणीबाबतचेधक्कादायक निरिक्षण; दोन ते ४० वयोगट धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:54 AM2020-04-24T10:54:40+5:302020-04-24T10:55:02+5:30
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण ९२ रुग्णांमधून दोन ते ४० वयोगटातील सर्वाधिक ६४ रुग्ण आहेत. यामुळे या वयोगटातील व्यक्तींनी स्वच्छतेकडे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे आणखी लक्ष देण्याची गरज असल्याचे ‘लोकमत’च्या निरीक्षणातून पुढे आले आहे.
नागपुरात ‘कोविड-१९’चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. मार्च महिन्यात १६ तर एप्रिलच्या २१ तारखेपर्यंत ७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांमध्ये नागपूरची शं•ारीकडे वाटचाल सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवीत आहे. यामुळे आणखी खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पॉझिटिव्ह आलेल्या ४७ रुग्णांमध्ये ३४ पुरुष व १३ महिला आहेत, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ( मेडिकल) ४५ रुग्णांमध्ये २० पुरुष व २५ महिला आहेत. ९२ रुग्णांमध्ये ५४ पुरुष तर ३८ महिला आहेत.
३८ महिलांमध्ये १० युवती
३८ महिलांमध्ये ३१ ते ४० वयोगटात १२ महिला तर ११ ते २० वयोगटात १० युवती आहेत. १ ते ३० वयोगटात चार, ४१ ते ५० वयोगटात सहा, ५१ ते ६० वयोगटात तीन, ६१ ते ७० वयोगटात एक तर २ ते १० वयोगटात दोन चिमुकलींचा समावेश आहे.
४१ वरील वयोगटात रुग्णांची संख्या कमी
मेयो, मेडिकलने प्राप्त करून दिलेल्या आकडेवारीनुसार २ ते १० वयोगटात पाच, ११ ते २० वयोगटात २०, २१ ते ३० वयोगटात १२, ३१ ते ४० वयोगटात २७, ४१ ते ५० वयोगटात १६, ५१ ते ६० वयोगटात सहा व ६१ ते ७० वयोगटात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. यात दोन ते ४० वयोगटात ६४ तर ४१ ते ७० वयोगटात २८ रुग्ण आहेत.
नागपुरातील वयोगटानुसार आकडेवारी (२२ एप्रिलपर्यंत) वयोगट रुग्णांची संख्या२ ते १० ५११ ते २० २०२१ ते ३० १२३१ ते ४० २७४१ ते ५० १६५१ ते ६० ६६१ते ७० ६