धक्कादायक! नागपुरात परराज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ७३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 10:31 AM2020-11-27T10:31:29+5:302020-11-27T10:44:57+5:30
Nagpur News corona मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे. विशेषत: कोविडच्या या काळात आतापर्यंत जिल्हाबाहेरील ६७३ रुग्णांनी उपचार घेतला. मात्र, यातील ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा हा दर ७३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, मागील पाच दिवसांत जिल्हाबाहेरील २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच संख्येत मृत्यूही झाले आहेत.
दिवाळीपूर्वी कमी झालेली करोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासकीयसह खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दिवाळीपूर्वी बाधितांची संख्या हजाराखाली गेली होती, ती आता १३७४ वर पोहचली आहे. सध्या मेडिकलमध्ये २००, मेयोमध्ये ८०, एम्समध्ये ३१ तर उर्वरीत रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. नागपुरात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगाणा आदी राज्यातून येणाऱ्या बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. हे रुग्ण उशिरा रुग्णालयात पोहचत असल्याने यात गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगीमध्ये उपचार घेणाऱ्या जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या मोठी आहे.
-एकाच दिवशी ११ रुग्ण, ११ मृत्यू
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात २० तारखेला ११ रुग्ण ११ मृत्यू, २१ तारखेला ५ रुग्ण ५ मृत्यू, २२ तारखेला १ रुग्ण १ मृत्यू, २३ तारखेला ७ रुग्ण ७ मृत्यू, २४ तारखेला ४ रुग्ण ४ मृत्यू तर २५ तारखेला १ रुग्ण व १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
-मेडिकलमध्ये ७ दिवसांत ११ मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील ७ दिवसात जिल्हाबाहेरील ४३ रुग्ण आले असताना १२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील ३, यवतमाळ जिल्ह्यातील २, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर मध्य प्रदेशातील २ रुग्णांचा समावेश आहे.
-उशिरा उपचार व गंभीर रुग्णांची संख्या अधिक
जिल्हाबाहेरुन येणारे बहुसंख्य रुग्ण उशिरा रुग्णालयात येतात. परिणामी, या रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याने यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. विशेषत: कोविड रुग्णांना नागपुरात आणताना ऑक्सिजनसह इतर बाबींची योग्य ती काळजी घेतली जात नसावी, हेही एक कारण असू शकते. लक्षणे दिसताच रुग्ण उपचाराखाली आल्यास जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.
-डॉ. प्रशांत पाटील
प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग