धक्कादायक ! वाहनाच्या छतावर बसून कऱ्हांडला अभयारण्यात ‘फोटोग्राफी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 09:36 PM2017-12-01T21:36:10+5:302017-12-01T21:39:40+5:30
गाय बांधून वाघाचे दर्शन, जिप्सीमध्ये बसलेल्या तरुणीची ओढणी ओढण्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार, अचानक बेपत्ता झालेला ‘जय’ या प्रकारांमुळे गाजलेले उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे.
अभय लांजेवार
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गाय बांधून वाघाचे दर्शन, जिप्सीमध्ये बसलेल्या तरुणीची ओढणी ओढण्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार, अचानक बेपत्ता झालेला ‘जय’ या प्रकारांमुळे गाजलेले उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. वनविभागाच्या वाहनाच्याच छतावर बसून वाघोबाची फोटोग्राफी करण्याचा हा अक्षम्य प्रकार फेसबूक व व्हॉट्सअॅपर व्हायरल झाल्याने हे अभयारण्या पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकाबाबत सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
या फोटोमधील परिसर उमरेड, पवनी, कऱ्हांडला अभयारण्यातील वनपरिक्षेत्र पवनी येथील आहे. चौफैर घनदाट वृक्षवल्ली असलेल्या ‘बॅकवॉटर साईड’ लगतचा हा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमक्या याच परिसरात वनविभागाचे पेट्रोलिंग वाहन उभे आहे. वाहनाचे मागील दोन्ही लाईट सुरू आहेत. वाहनाच्या छतावर एक तरुणआरामात टेकला असून, तो निवांतपणे वाघाचे फोटोशुट करीत आहे. असे हे ‘छायाचित्र’ असून, एमएच-३६/के-०१७६ असा या पेट्रोलिंग वाहनाचा क्रमांक फोटोमध्ये दिसून येतो. हे वाहन वनविभागाच्या कोणत्या अधिकाºयाच्या अखत्यारीत आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
छायाचित्रात दिसणारा वाघ हा ‘जय’चा बच्चा (पिलू) असून तो ‘जयचंद’ या नावाने परिचित आहे. जयचंद अंदाजे तीन वर्षाचा असून, तो जयसारखाच रूबाबदार दिसतो. फोटो काढत असतानाचे हे छायाचित्र वनविभागाच्या वाहनाच्या छतावरून काढले आहे. त्या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असा नामोल्लेख स्पष्टपणे दिसतो. वाहन वनविभागाचे असले तरी, वाहनावर बसून फोटोग्राफी करणारा तो तरुण कोण, त्याचा वनविभागाशी काय संबंध, वनविभागात तो कोणत्या पदावर कायग्रत आहे, त्याच्यासोबत अन्य वन कर्मचारी वा अधिकारी होता काय, यावर आता खमंग चर्चा सुरू आहे.
सदर प्रकरण गंभीर असून, या अशा प्रकारांमुळे वन्यजीवांना धोका उद्भवू शकतो. शिवाय, वन्यप्राण्यांच्या वर्तवणुकीवरही घातक परिणाम होऊ शकतो, अशीही भीतीही काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली. अशाप्रकारे फोटोशुट करण्याचा अधिकार नेमका कुणी दिला, असाही सवाल विचारला जात असून, अभयारण्यातील या फोटोशुट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे.
नियम बदलले काय?
जंगल सफारी करीत असताना पर्यटकांना वाहनाच्या बाहेर निघता येत नाही. आपल्या शरीराचा कोणताही भाग बाहेर काढण्यास सक्त मनाई आहे. वनकर्मचारी असो अथवा वनविभागाचे बडे अधिकारी असोत, अशाप्रकारे वाहनाच्या छतावर बसून फोटोग्राफी करता येत नाही. असे असताना वाहनाच्या छतावरून फोटोग्राफीचा हा प्रकार अत्यंत निंदनिय असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांशी सुरू असलेला हा खेळ कुणाच्याही जीवावर बेतू शकतो, असे असताना याप्रकरणी अद्याप कारवाई झाली नाही, हे उल्लेखनिय. सर्वत्र फोटोची जोरदार चर्चा सुरू असताना वनविभागाच्या कोणत्याच अधिकाºयापर्यंत सदर फोटो कसा पोहोचला नाही, असा सवाल विचारला जात आहे. वनविभागाने जंगल सफारीचे अथवा पेट्रोलिंगचे नियम बदलले काय, असाही प्रश्न या गंभीर प्रकरणामुळे उपस्थित केला जात आहे.