कुख्यात बग्गाच्या तपासातून धक्कादायक खुलासे : अनेकांचे बुरखे फाटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:58 PM2021-06-03T22:58:05+5:302021-06-03T22:58:52+5:30
Bagga case वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रतिस्पर्ध्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्या मोबाइल शॉपीत एमडी (ड्रग) ठेवणारा कुख्यात गुन्हेगार गाैरवसिंग बग्गा याच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रतिस्पर्ध्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्या मोबाइल शॉपीत एमडी (ड्रग) ठेवणारा कुख्यात गुन्हेगार गाैरवसिंग बग्गा याच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक पांढरपेशे आणि दलालांचे बुरखे लवकरच फाटण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. बग्गा सध्या गुन्हेशाखेच्या कस्टडीत आहे.
वादग्रस्त जमिनीच्या साैदे आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे बग्गा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे मात्र; गेल्या वर्षी वाठोड्यातील एका वादग्रस्त जमिनीच्या बनावट खरेदी विक्रीपत्रातून तो चर्चेला आला. त्यानंतर घडलेल्या घडामोडीमुळे बग्गा आणि त्याच्या विरोधी गटातील मंडळींनी एकमेकांना अडकविण्यासाठी वेगवेगळे कटकारस्थान रचले. त्यात गॅंगस्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून दलाली करणारे सक्रिय झाले. या पार्श्वभूमीवर, बग्गाने प्रतिस्पर्धी गटातील एका मोबाईल विक्रेत्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्या दुकानात एमडीच्या पुड्या ठेवल्या अन् स्वताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी छापा मारल्यानंतर पुढच्या तपासात बग्गाचे कटकारस्थान उघड झाले. यानंतर बग्गा फरार झाला. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतत सक्रीय ठेवले अन् अखेर बग्गाला चार दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अटक करण्यात आली. तो सध्या गुन्हे शाखेच्या कस्टडीत आहे. त्याच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. वादग्रस्त जमिनीचेही खोदकाम पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आज बग्गाला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा पुन्हा एक दिवसाचा पीसीआर वाढवून घेतला.
डी रजिस्ट्रीचे दस्तावेज
बग्गाकडून अनेक डी रजिस्ट्रीची माहिती पोलिसाना मिळाली आहे. भूमाफिया आणि त्याचे दलाल कुणाला समोर करून कशा पद्धतीने डाव साधण्याच्या तयारीत होते, त्याचीही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे प्रकरणाशी संबंधितांनी वेगवेगळे डावपेच लढवणे सुरू केले आहे. दुसरीकडे बग्गाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यातही एकाने तक्रार नोंदवली असून, त्याचीही चाैकशी पोलीस करीत आहेत. या प्रकरणात दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्यांवरही पोलिसांनी नजर रोखली आहे.