धक्कादायक - विसर्जन करताना ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली
By admin | Published: September 15, 2016 05:54 PM2016-09-15T17:54:37+5:302016-09-15T17:54:37+5:30
आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला
Next
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 15 - आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बचावलेल्या पंकज खवशी याने लगेच घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. तिघांनाही वाचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे यात यश आले नाही. यामध्ये त्या तिघांचाची करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तारासावंगाचे सरपंच रत्नपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारी करणारे वघाळ जि. अमरावती येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविले होते. दुपारी ४ वाजता तिघांचेही मृतदेह गवसले. यानंतर पंचनामा करून मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी परीसरातील शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे माणिकवाडा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावकरी एकत्र जमले आहे. तारसावंगा येथील कड नदीवर असलेल्या पुलावरुनच अनेकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. माणिकवाडा येथील गावकऱ्यांनीही पुलावरूनच गणेश विसर्जन केले. मात्र हंसराज सोमकुंवर, केवल मसराम, चेतन नेहारे व पंकज खवशी यांनी नदीच्या पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. ही मंडळी मूर्ती घेऊन खोल पाण्यात गेलीे. मूर्तीच्या विसर्जनाचा प्रसंग आला तेव्हा त्यांना गणेशमूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेतानाच त्यांचा तोल गेला. यामध्ये तिघांना आपल्या प्राणास मुकावे लागले.