धक्कादायक ! नागपूर जिल्ह्यातील सुराबर्डी तलावात मिसळतेय शौचालयातील पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:11 PM2021-12-01T19:11:50+5:302021-12-01T19:28:51+5:30
Nagpur News नागपूरजवळ असलेल्या सुराबर्डी तलावात संडास व मूत्रीघरातले पाणी मिसळत असल्याची बाब समोर आली असून, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर : तब्बल ७५.३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवीत असलेल्या सुराबर्डी तलावामध्ये शौचालय व मूत्रीघरातील पाणी मिसळत आहे. याशिवाय जनावरांच्या गोठ्यांतील घाण व स्मशानभूमीतील राखही तलावात फेकली जात आहे. परिणामी, हा तलाव प्रदूषित झाला आहे.
शेतकरी नितीन शेंद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, निष्काळजी व उदासीनता यांमुळे हा भव्य व आकर्षक तलाव कायमचा निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. लावा-सुराबर्डी पाणीपुरवठा योजनेंतर्गत परिसरातील अनेक गावांना या तलावाचे पाणी पुरविले जाते. असे असतानाही तलाव संपवला जात आहे.
सुराबर्डी गावातील सांडपाणी तलावात सोडले जात आहे. त्यासोबत संडास व मूत्रीघरातील घाण तलावात मिसळत आहे. तलावाजवळ जनावरांचे गोठे आहेत. तेथील घाणदेखील तलावात टाकली जात आहे. याशिवाय गावातून तलावाकडे जाणाऱ्या ६० मीटर रुंदीच्या पांधन रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यामुळे केवळ १० फूट रुंदीचा रस्ता मोकळा राहिला आहे. परिणामी, या रस्त्यावर अपघात वाढले आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारला नोटिस
या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेतील आरोप गंभीरतेने घेऊन राज्य सरकार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदींना नोटीस बजावली व यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सुधीर मालोदे तर, सरकारतर्फे ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.