धक्कादायक! साक्षगंध झालेल्या तरुणीने पेटवून घेत केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 08:44 PM2023-05-23T20:44:31+5:302023-05-23T20:44:57+5:30
Nagpur News साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला.
नागपूर : साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला. ही हृदयद्रावक घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पॉप्युलर सोसायटीत मंगळवारी २३ मे रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या या टोकाच्या पावलामुळे तिचे आई-वडील आणि भावावर संकट कोसळले आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
प्राजक्ता चंद्रशेखर बांगरे (वय २२, रा. प्लॉट नं. ५८, पॉप्युलर सोसायटी, वाडी) असे रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि मोठा भाऊ आहे. तिचे वडील मनोरुग्ण असल्यामुळे घरीच असतात, तर आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाकाचे काम करते. प्राजक्ताचा मोठा भाऊ पारस (वय २८) खासगी काम करतो.
नागपूरच्या मानेवाडा परिसरातील बालाजीनगर येथील शैलेश कावडे या मुलासोबत ३० एप्रिल २०२३ रोजी प्राजक्ताचे साक्षगंध झाले. साक्षगंधही तिच्या मर्जीनेच झाल्याचे पोलिसांनी सांगितले; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना मंगळवारी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सकाळी ७:३० वाजता तिचे वडील फिरायला गेले होते. आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी गेली होती, तर मोठा भाऊ हॉलमध्ये झोपला होता. यावेळी प्राजक्ताने एका खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर तिने आपल्या अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेतले.
ती पेटल्यानंतर घरात धूर झाल्यामुळे तिचा मोठा भाऊ झोपेतून जागा झाला. त्याला घरातील खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता बहीण पेटलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी गोळा झाले. तिच्या भावाने वाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लगेच वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी जळालेल्या अवस्थेतील प्राजक्ताला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले; परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही सुसाइड नोट लिहून ठेवली नाही. वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वाडी पोलिस करीत आहेत.
२८ नोव्हेंबरला ठरले होते लग्न
प्राजक्ताचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. तिचा भावी पतीही नोकरीवर होता. नोव्हेंबर महिन्यात २८ तारखेला तिचे लग्न ठरले होते. लग्नासाठी कुटुंबीय तयारीला लागले होते. दोन दिवसांपूर्वी प्राजक्ता तिचा भावी पती शैलेशच्या परिवारासोबत कोराडी मंदिरात गेली होती; परंतु तेथून आल्यापासून ती शांत राहत होती. घरी रॉकेल नसताना पाच लिटर रॉकेल कोठून आले? असा प्रश्न तिच्या भावाला पडला आहे.