धक्कादायक ; अंत्यसंस्कारासाठी घेतात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:07 AM2021-04-27T04:07:23+5:302021-04-27T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृतांवर मनपाचे कर्मचारी अंतिम संस्कार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृतांवर मनपाचे कर्मचारी अंतिम संस्कार करतात. घाटावर गर्दी वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानेवाडा घाटावर हा प्रकार सुरू आहे. मृताचे नातेवाईक कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संकटात असताना हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
महापालिकेच्या सर्व घाटांवर अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ मोफत उपलब्ध केले आहेत. जेथे मोक्षकाष्ठ नाहीत अशा घाटावर गोवऱ्या व लाकूड मोफत दिले जाते. पाच घाटांवर शवदाहिनीची सुविधा आहे. दुसरीकडे काही कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याने यंत्रणेची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र मागील काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा मृतदेहांवर मनपाचेच कर्मचारी अंतिम संस्कार करतात. काही घाटावर वेटिंग असल्याने लवकर अंतिम संस्कारासाठी पैसे घेत असल्याचा प्रकार सुरू आहे.
कोरोना विषाणूने शहरात अक्षरश: थैमान घातले असून मृत्यूचा आकडा ८० च्या पुढे गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. असे असताना मानेवाडा घाटावर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड हजार रुपये घेतल्याची माहिती मृताच्या नातेवाईकानी दिली. घाटावरील कंत्राटदाराच्या लोकांकडून ही वसुली सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे यंत्रणा बदनाम होत आहे.
...
दोषींवर काय कारवाई करणार?
महापालिकेकडून मृतदेहासाठी गोवऱ्या आणि लाकडे मोफत पुरविली जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. कोणी पैसे मागितले तर व या संदर्भात तक्रार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मानेवाडा घाटावरील प्रकारासंदर्भात मनपा प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याची नागरिकांना उत्सुकता आहे.