Coronavirus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात प्रशासनाच्या आकडेवारीच्या तिप्पट कोरोना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 08:04 AM2021-04-28T08:04:47+5:302021-04-28T08:06:39+5:30

Coronavirus in Nagpur मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर कोरोनाबाधितांवर करण्यात आलेले अंत्यसंस्कार यात मोठा फरक दिसून येत आहे.

Shocking! Three times more corona deaths than administration figures in Nagpur |  Coronavirus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात प्रशासनाच्या आकडेवारीच्या तिप्पट कोरोना मृत्यू

 Coronavirus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात प्रशासनाच्या आकडेवारीच्या तिप्पट कोरोना मृत्यू

Next
ठळक मुद्देसोमवारी एकाच दिवशी २८८ कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कारमनपाने दाखविले ८९ मृत्यू मृत्यूच्या आकडेवारीत इतका फरक कसा?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर कोरोनाबाधितांवर करण्यात आलेले अंत्यसंस्कार यात मोठा फरक दिसून येत आहे. जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार होत असताना प्रशासनातर्फे कमी आकडे का दाखविले जात आहेत हा मोठा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.

सोमवारी जिल्ह्यात ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील २५, तर जिल्ह्याबाहेरील दहा जणांचा समावेश होता. परंतु शहरातील १४ घाटांवर सोमवारी तब्बल ३९२ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ इतकी आहे, तर १०४ नॉनकोविड मृत्यूची नोंद घाटावर करण्यात आल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.

एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात गृह विलगीकरणातील रुग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचा परिणाम शहरातील दहन घाटांवर दिसू लागला आहे. शहरातील घाटांवर दररोज ३५० ते ४०० अंतिम संस्कार होत आहेत. शहरातील प्रमुख पाच घाटांवर दररोज ४० ते ६० मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जात आहेत. यातही कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे.

प्रमुख घाटांवर वेटिंग

शहरातील गंगाबाई घाट, मोक्षधाम, मानेवाडा व अंबाझरी या प्रमुख घाटांवर दररोज ४० ते ६० कोविड मृतकांवर अंतिम संस्कार होतात. एकाचवेळी आठ ते दहा मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत असल्याने मृतकांच्या नातेवाइकांना अंतिम संस्कारासाठी ओटे खाली होण्याची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील घाटावर रात्री उशिरापर्यंत चिता धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

१५ दिवसात चार हजारांहून अधिक अंतिम संस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५०हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृहविलगीकरणात असलेल्यांचाही समावेश आहे. गृहविलगीकरणातील असलेल्यांची नोंद होत नसल्याने त्यांचा कोविड मृत्यूत समावेश होत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

दररोज ७० ते ८० नैसर्गिक मृत्यू

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. शहरात दररोज ७० ते ८० मृत्यू नैसर्गिक व आजारामुळे होतात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मृतकांचा आकडा हा ३०० ते ४०० पर्यंत पोहोचला आहे. यामुळे प्रमुख घाटांवर एकाचवेळी आठ ते दहाजणांवर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. ओटे खाली नसल्याने खालील जागेतही अंतिम संस्कार होत आहेत.

२० कब्रस्थानातही गर्दी वाढली

नागपूर शहरात मुस्लीम समुदायाचे दहा तर ख्रिश्चन बांधवांचे दहा असे २० कब्रस्थान आहेत. येथे कोविड संक्रमणापूर्वी दररोज सरासरी १० ते १२ दफन विधी व्हायचे; परंतु कोरोनामुळे हा आकडा २५ च्या पुढे गेला आहे. मागील काही दिवसात कब्रस्थानात दफन विधीसाठी गर्दी वाढली आहे. मुस्लीम समुदायाचे भानखेडा, ताजनगर टेका, हसनबाग, जरीपटका, ताजबाग, पारडी, भांडेवाडी, पिली नदी आदी भागात कब्रस्थान आहेत, तर ख्रिश्चन बांधवांचे जरीपटका, सेन्ट मार्टीन, काटोल रोडवर, मानकापूर, मोहन नगर, युनियन चर्च, सेंट थॉमस, सेंट अ‍ॅन्थॉनी आदी ठिकाणी कब्रस्थान आहेत.

Web Title: Shocking! Three times more corona deaths than administration figures in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.