धक्कादायक! ट्रक चालकाची केबिनला लटकून आत्महत्या; १६० तेलाचे बॉक्स चोरी प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 02:10 PM2021-06-15T14:10:08+5:302021-06-15T14:10:28+5:30
Nagpur News सोयाबीन तेलाचे बॉक्सेस घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी गेल्यानंतर या ट्रकच्या चालकाने केबिनला तारेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सोयाबीन तेलाचे बॉक्सेस घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी गेल्यानंतर या ट्रकच्या चालकाने केबिनला तारेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अशोक जितूलाल नागोत्रा असे या चालकाचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
सोयाबीन तेलाची खोकी घेऊन ९ जून रोजी सावनेरहून ट्रक क्र. एम.एच. ०४-जी.आर.२७७४ मुंबईकडे रवाना झाला होता. कामठी येथील रहिवासी असलेला ड्रायव्हर अशोक जितूलाल नागोत्रा (२५) हा एकटाच ट्रक चालवीत होता. रात्री १२.३० च्या सुमारास अमरावती मार्गावरील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारगाव येथील भारत पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून झाल्यावर तो केबिनमध्ये झोपी गेला. १० जूनला सकाळी सातच्या सुमारास तो उठला तेव्हा, ट्रकची ताडपत्री कापून १६० तेलाचे बॉक्सेस पळवल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरी गेलेल्या बॉक्सेसची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार आहे. ट्रकमध्ये १७०० बॉक्सेस होते. या प्रत्येक बॉक्सची किंमत २३०० रु. आहे. चोरीच्या या घटनेची तक्रार कोंढाळी पोलिस ठाण्यात करण्यात आली. कोंढाळीचे ठाणेदार प्रफुल्ल फुल्लरवार यांनी चौकशी केली असता, संबंधित पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता.
दरम्यान अशोक नागोत्रा याच्याविरुद्ध १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या ट्रकमधील मालाचे मोजमाप करायचे असल्याकारणाने हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारातच उभा होता.
मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा या चालकाचा मृतदेह या ट्रकच्या केबिनबाहेर गळफास अडकलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. या घटनेची माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आली आहे. अशोकचा मृतदेह नागपूरला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.