खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
By जितेंद्र ढवळे | Published: October 2, 2024 12:16 PM2024-10-02T12:16:47+5:302024-10-02T12:27:33+5:30
Nagpur : मृतकापैकी एक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी; जामिनावर आला होता बाहेर
श्याम नाडेकर/अविनाश गजभिये
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड (नागपूर) :नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोवाड (ता. नरखेड) येथे बुधवारी घडली आहे. वडील विजय मधुकर पाचोरी (62) व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्यासोबत पत्नी माला विजय पाचोरी (54), मोठा मुलगा डिंकू विजय पाचोरी (40) व लहान मुलगा गणेश विजय पाचोरी (37) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 7:30 ला उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मोवाड येथील वॉर्ड क्र 5 मधील खोब्रागडे यांच्या कडे पाचोरी कुटुंब भाड्याने राहत होते. सकाळी शेजाऱ्याना हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी नरखेड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहे.
आत्महत्यांचे कारण अद्यापही समजले नाही. पण धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळले त्यामुळे ह्या आत्महत्याच आहेत कि अजून काही अशे अनेक तर्क-वितर्क नागरिकांकडून लावले जात आहे. तर पोलिसांच्या तर्कानुसार वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृतकापैकी एक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी
सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता आणि काही दिवसांपूर्वीच तो जमीनावर बाहेर आला होता, अशी माहिती आहे. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीमुळे वाद वाढला असावा, वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच घरातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.