धक्कादायक; राज्यात भारनियमनाचे दिवस परत येणार? दोन दिवसांपुरताही कोळसा शिल्लक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 07:00 AM2021-10-12T07:00:00+5:302021-10-12T07:00:02+5:30
Nagpur News देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही.
कमल शर्मा
नागपूर : देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. परिणामी १०,२१२ मेगावॉट विजेच्या उत्पादन क्षमतेच्या तुलनेत केवळ ५५३८ मेगावॉट इतकेच उत्पादन होत आहे. दुसरीकडे महावितरणने नागरिकांना सकाळी व सायंकाळी वीज बचत करण्याचे आवाहन करत भारनियमन सुरू होण्याचे संकेतसुद्धा दिले आहेत.
राज्यभरातील वीज केंद्रांमध्ये जवळपास २० दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असतो. पावसाळ्यात हा स्टॉक ५ ते ७ दिवसांपर्यंत येतो. परंतु यावर्षी हा स्टॉक यापेक्षाही कमी झाला आहे. ३ दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर त्याला अतिसंवेदनशील परिस्थिती मानली जाते. वीज केंद्रांसाठी ही धोक्याची घंटा असते. अशा स्थिती कोळसा पुरवठा होण्यास थोडीही अडचण आली तर वीज केंद्र बंद पडू शकते. महाजेनकोचे म्हणणे आहे की, यंदा चांगला पाऊस झाला. खुल्या खदाणींमध्ये पाणी भरले. त्यामुळे कोळशांचे उत्पादन प्रभावित झाले. परिणामी कोळसा पुरवठा होत नाही आहे. सध्या चंद्रपूरमध्ये सर्वाधिक १.६४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोराडी, नाशिक, भुसावळ व खापरखेडा येथे एक दिवस आणि इतर वीज केंद्रांमध्ये त्यापेक्षाही कमी दिवसाचा साठा शिल्लक आहे. खासगी वीज केंद्रातील परिस्थितीही सारखीच आहे. अशा परिस्थितीत अनेक वीज संच बंद पडले आहेत.
महाजेनकोच्या वीज केंद्रातील स्थिती
केंद्र - उपलब्ध कोळसा - किती दिवस
कोराडी (६६०) १६१०० मेट्रीक टन - ०.६ दिवस
कोराडी (२१०) ४१६५ मेट्रीक टन- १.१९ दिवस
नाशिक - ८२३६ मेट्रीक टन- १.१८ दिवस
भुसावळ - २८,७३० मेट्रीक टन- १.३४ दिवस
परळी - ९६७५ मेट्रीक टन - ०.७२ दिवस
पारस - ६९४८ मेट्रीक टन- ०.७७ दिवस
चंद्रपूर - ८६,२६४ मेट्रीक टन- १.६४ दिवस
खापरखेडा - ३१,२५८ मेट्रीक टन- १.३ दिवस
-------------------------------
एकूण - १,९१,३४७ मेट्रीक टन