धक्कादायक! महिलेने बनवली मित्राच्या पत्नीची अश्लील चित्रफीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:03 PM2018-08-17T15:03:26+5:302018-08-17T15:06:14+5:30
मध्यप्रदेशातील इंदोरची एक महिला तिच्या मित्राच्या पत्नीला आपल्या घरी बोलवून घेते. तिची बडदास्त ठेवते. ती विश्वासाने त्या घरात एकदा कपडे बदलत असताना तिची नको त्या अवस्थेतील चित्रफीत मोबाईलमध्ये तयार करते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यप्रदेशातील इंदोरची एक महिला तिच्या मित्राच्या पत्नीला आपल्या घरी बोलवून घेते. तिची बडदास्त ठेवते. ती विश्वासाने त्या घरात एकदा कपडे बदलत असताना तिची नको त्या अवस्थेतील चित्रफीत मोबाईलमध्ये तयार करते. आठ महिन्यानंतर या चित्रफीतीची सीडी संबंधित विवाहितेला कुरियरने पाठविते. हा व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी देते. एखाद्या सिरियलचे कथानक वाटणारी ही रियल स्टोरी नागपूर ते इंदोर दरम्यानची आहे. या प्रकरणाने केवळ दोन कुटुंबातच नव्हे तर दोन राज्याच्या पोलीसांमध्येही वाद निर्माण केला होता.
पती, पत्नी आणि ती, असा तिहेरी कंगोरा या गुन्ह्यातील घटनाक्रमाशी जुळलेला आहे. तक्रार करणारी महिला (वय ३५) अजनीत राहते. तर, आरोपी महिला दीपमाला चेतन चौधरी मध्यप्रदेशमधील इंदोरच्या नंदानगरातील रहिवासी आहे. तक्रार करणा-या महिलेचा पती आणि आरोपी महिला दीपमाला चौधरी हे मार्केटींग फिल्डमध्ये सोबत काम करताना त्यांच्यात स्रेहाचे संबंध होते. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणे-येणेही होते. १३ नोव्हेंबर २०१७ ला पीडित महिला आरोपी दीपमालाच्या इंदोरमधील घरी गेली होती. त्यावेळी चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून ठेवून, तक्रार करणाऱ्या महिलेचा कपडे बदलविताना दीपमालाने व्हिडीओ तयार केला. नंतर पीडित महिलेचा पती आणि दीपमालाचे संबंध बिघडले. त्यामुळे दीपमालाने आधीच मोबाईलमध्ये तयार करून ठेवलेल्या अश्लिल चित्रफीतीची सीडी तयार केली. २३ जुलै २०१८ ला पीडित महिला तिच्या घरी असताना तिला एक कुरियर मिळाले. या कुरियरमध्ये मनोहर कहानिया (पुस्तक), धमकीपत्र तसेच एक सीडी होती. महिलेने ती सीडी लावून बघितली असता तिला जबर मानसिक धक्का बसला. त्यात तिच्या एकांत क्षणाचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी दीपमाला चौधरीने पीडित महिलेला धमकी पत्रातून दिली होती. त्यामुळे पीडित महिलेने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांची टोलवाटोलवी
अश्लील व्हिडीओ इंदोरला बनविण्यात आल्यामुळे अजनी पोलिसांनी ते प्रकरण तपासासाठी तीन आठवड्यांपूर्वी मध्यप्रदेश (इंदोर) पोलिसांना पाठविले. इंदोर पोलिसांनी घटनाक्रम बघून महिलेला नागपूरात लज्जा निर्माण झाल्याचा युक्तीवाद करून तेथेच गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथून पुन्हा ते प्रकरण नागपूर पोलिसांकडे परत आले. हे प्रकरण कानावर जाताच उपायुक्त निलेश भरणे यांनी लगेच अजनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणी गुरुवारी आरोपी दिपमाला चौधरीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार
तपासादरम्यान, या प्रकरणात पुन्हा एक नवा पैलू उघड झाला आहे. त्यानुसार, दीपमालाने इंदोर पोलिसांत पीडित महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ‘त्याच्याकडून’ आपला शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे दीपमालाने त्या तक्रारीत नमूद केले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. त्यामुळे अजनी पोलिसांकडून दीपमालाविरुद्ध आणि इंदोर पोलिसांकडून तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.