धक्कादायक, अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; माशांचा मृत्यू
By निशांत वानखेडे | Published: September 19, 2023 07:46 PM2023-09-19T19:46:34+5:302023-09-19T20:09:29+5:30
शेवाळ, जलपर्णी की आणखी काही : एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्यात हिरवी कायी
नागपूर : अंबाझरी तलावाकडे फिरणाऱ्या लाेकांना मंगळवारी धक्कादायक व धाेकादायक स्थिती दिसून आली. या तलावाच्या पाण्याला हिरवा रंग आला आहे. पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगताना दिसून येत आहे. तलावात अनेक मासे मरून पडल्याचेही दिसून आले.
पर्यावरण प्रेमी मंगेश कामुने यांनी याबाबत माहिती दिली. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असलेल्या ओव्हरफ्लाेच्या पाॅइंटवर पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण तलावाची पाहणी केली असता बहुतेक भागात पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. पाण्यावर तेल तरंगावे तशी हिरवी कायी तरंगत हाेती. विशेष म्हणजे एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्याकडून हा हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहत येत असल्याचे त्यांना आढळले. पाण्याला दुर्गंधी येत असून तलावात अनेक मासे मरून पडले आहेत. त्यांनी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र हा प्रकार आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगत त्यांनी दुर्लक्ष केले.
तज्ज्ञांच्या मते बऱ्याच वेळा जलपर्णी किंवा शेवाळामुळे पाण्याला हिरवा रंग येताे. तलावात माेठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पतींची वाढ झाली असून याबाबत लाेकमतने यापूर्वीच वृत्त प्रकाशित केले हाेते. शिवाय तलावात नाल्याद्वारे सिवेज सुद्धा प्रवाहित हाेत असल्याने या मिश्रणातून धाेकादायक गाेष्टी तयार हाेतात. त्यामुळे सुद्धा पाण्याला हिरवा रंग आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बाेलले जात आहे. मात्र कुठूनतरी रासायनिक घटक प्रवाहित झाल्याची शक्यता नाकारण्यात येत आहे.
प्राणवायू कमी झाल्यानेही माशांचा मृत्यु
शेवाळ व जलपर्णी ही वनस्पती माेठ्या प्रमाणात पाण्यातील ऑक्सिजन शाेषून घेते. त्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांचा मृत्यु हाेत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पिण्यासाठीही हाेताे पुरवठा
अंबाझरी तलावातून शहरात पिण्याचा पाण्याचा पुरवठासुद्धा केला जाताे. त्यामुळे मानवी आराेग्यावर परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: पाेटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे.
शेवाळ किंवा जलपर्णीमुळे पाण्याला हिरवा रंग येण्याची शक्यता आहे. त्यात सिवेजच्या मिश्रणाचाही समावेश असू शकताे. मात्र अंबाझरी तलावातील पाण्याला हिरवा रंग का आला, हे स्पष्ट सांगता येणार नाही. त्यासाठी पाण्याची सखाेल तपासणी करण्याची गरज आहे.
- डाॅ. पवन लाभशेटवार, शास्त्रज्ञ, नीरी.