पाचगाव येथील दुकानात धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:09+5:302021-09-05T04:13:09+5:30
कुही : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव (ता. उमरेड) येथील दुकानात धाड ...
कुही : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव (ता. उमरेड) येथील दुकानात धाड टाकत २,४२२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १) दुपारी करण्यात आली.
कृष्णा पुरुषाेत्तम येळणे (४३, रा. पाचगाव, ता. उमरेड) यांचे पाचगाव येथे द्वारका माई किराणा व जनरल स्टाेर्स नामक दुकान आहे. ते दुकानातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याची माहिती कुही पाेलिसांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास धाड टाकून या दुकानाची झडती घेतली.
यात त्यांना सुगंधित तंबाखूचे १५ टिन व पाकिटे तसेच पानमसाला नामक गुटख्याची पाकिटे आढळली. राज्य शासनाने या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातली असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला. याची एकूण किंमत २,४२२ रुपये असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी अनंतकुमार चाैधरी (४८, रा. नागपूर) यांनी सांगितले.
याप्रकरणी कुही पाेलिसांनी अनंतकुमार चाैधरी यांच्या तक्रारीवरून दुकानदार कृष्णा येळणे यांच्या विराेधात भादंवि १८८, २७२, २७३, ३२८, अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे विविध सहकलमान्वये गुन्हा नाेंदविला आहे.
...
फसवणुकीनंतर प्रकार उघडकीस
कृष्णा पुरुषाेत्तम येळणे हे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याने अन्न व औषध प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी कुणाल संजय मेश्राम (३०, रा. जगजीवननगर, नागपूर) व मंगल भीमराव सुरटकर (४१, रा. महादुला-काेराडी राेड, नागपूर) या दाेघांनी त्यांना सहा लाख रुपयांची मागणी केली हाेती. यासाठी तीन लाख रुपये देण्याचे कृष्णा येळणे यांनी मान्य केले हाेते. यातील दाेन लाख रुपये दिल्यानंतर दाेघांनी त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावल्याने प्रकरण पाेलिसात गेले आणि कुही पाेलिसांनी दाेघांना अटक केली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.