कर्जबाजारीपणामुळे दुकानदाराने तलावात घेतली उडी, बिट मार्शल्स ठरले देवदूत
By योगेश पांडे | Published: May 7, 2024 04:51 PM2024-05-07T16:51:44+5:302024-05-07T16:53:10+5:30
Nagpur : नागपूर पोलिसांच्या दोन बिट मार्शल्सने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारत वाचविला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्जबाजारीपणामुळे एका मेडिकल दुकानदाराने चक्क जीव संपविण्याचा अविचार करत अंबाझरी तलावात उडी मारली. ते गटांगळ्या खात असताना नागपूर पोलिसांच्या दोन बिट मार्शल्सने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारत स्थानिकांच्या मदतीने त्याचा जीव वाचविला. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाला वाऱ्यावर सोडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारासाठी बिट मार्शल्स देवदूतच ठरले.
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अविनाश नावाच्या एका औषधी दुकानदारावर कर्ज झाले होते. कर्जाला कंटाळून त्याने जीव देण्याचा विचार केला. तो अंबाझरी तलावाजवळ गेला व पाण्यात उडी घेतली. स्थानिक लोकांनी हे पाहून आरडाओरड केली व पोलिसांना माहिती दिली. बिट मार्शल प्रशांत गायधने व यशवंत धावडे हे तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तलावात उडी मारून अविनाशला बाहेर काढले व तातडीने प्रथमोपचार दिले. चौकशीदरम्यान अविनाशचे मानेवाड्याजवळ औषधांचे दुकान असल्याची बाब समोर आली. दोघांनीही अविनाशला हिंमत दिली व अंबाझरी पोलीस ठाण्यात नेले. ठाणेदार विनायक गोल्हे यांनीदेखील अविनाशचे समुपदेशन केले व कुटुंबियांना माहिती देत बोलावून घेतले. अविनाश यांचा कुटुंबियांना पाहताच बांध फुटला व असा अविचार करणार नाही अशी भावना व्यक्त केली. गायधने व धावडे यांचा धाडसी कामगिरीसाठी पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला.