खरेदीचा ट्रेंड बदलतोय !

By admin | Published: October 30, 2014 12:50 AM2014-10-30T00:50:05+5:302014-10-30T00:50:05+5:30

दिवाळी आणि खरेदी हे समीकरण आता बदलले आहे. पूर्वी वर्षभर आवश्यक खरेदी व्हायची आणि दिवाळीची खरेदी स्पेशल असायची. मुलांचे कपडे असो वा घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी

Shopping trends are changing! | खरेदीचा ट्रेंड बदलतोय !

खरेदीचा ट्रेंड बदलतोय !

Next

आता वर्षभर खरेदी : बाजारात नेहमीच गर्दी
नागपूर : दिवाळी आणि खरेदी हे समीकरण आता बदलले आहे. पूर्वी वर्षभर आवश्यक खरेदी व्हायची आणि दिवाळीची खरेदी स्पेशल असायची. मुलांचे कपडे असो वा घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी फक्त दिवाळीला व्हायची. गेल्या काही वर्षांत खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. वस्तू छोटी असो वा मोठी आता वर्षभर खरेदी होऊ लागल्याने व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे.
गर्दीत खरेदीची मजा वेगळीच
शरद दुरुगकर यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी बाजारात कितीही गर्दी असली तरी आपण खरेदीला जायचो. दुकानदाराला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा परिस्थितीतही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात आपल्या आवडीच्या वस्तूसाठी आई-वडील आणि भाऊ-बहिणीसोबत फिरायचो. त्यावेळचा उत्साह वेगळाच होता. पण आता सणासुदीला केली जाणारी खरेदी आता मनोरंजनाचा एक भाग झाली आहे. कंटाळा घालवण्यासाठी कुणी खरेदी करतो, वेळ आहे म्हणून कुणी करतो तर कुणी मूड छान करण्यासाठीही शॉपिंगला पळतो. तरीही दिवाळीची मजा खरेदीशिवाय अपुरी आहे, हे निश्चित.
पूर्वी खरेदीला पर्याय नव्हता
ललिता भांडारकर म्हणाल्या की, अगदी काही वर्षांपूर्वीची दिवाळी आठवा किंवा आपल्या आई-मावशी किंवा ताईला त्याबद्दल विचारा. पूर्वी खरेदीला पर्याय नव्हता. वडील जे घेऊन द्यायचे, तेच आम्ही वर्षभर पुरवायचो. नवीन खरेदी दिवाळीतच करण्याचा त्यांचा नित्यनेम होता. वर्षात केव्हा तरी घेऊन मागायची हिंमतच नव्हती. शाळेचा पोशाखसुद्धा वर्षभर सांभाळावा लागत होता. वाढत्या वयानुसार अनुभव वेगळाच येऊ लागला. मुले वर्षात केव्हाही खरेदीची मागणी करू लागले आहेत. आम्हीसुद्धा त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवत आहे. आता तेही जुने झालेत आणि घरबसल्या खरेदीचा पर्याय लोकप्रिय व्हायला लागला आहे.
आॅनलाईन खरेदीतही गर्दी
प्राचार्य संजय मोवाडे यांनी सांगितले की, पूर्वी दिवाळीत एका ड्रेसपुरती होणारी खरेदी आता आॅनलाईन होऊ लागली आहे. दिवाळीपूर्वी वडिलांसोबत बाजारात जाऊन वस्तूंची खरेदी करण्याची मजा वेगळीच होती. आवडनिवड बाजूला ठेवून वडिलांनी खरेदी केलेली वस्तू पिशवीत ठेवायचे काम करायचो. दोन्ही हातात भरलेल्या पिशव्या मोहल्ल्यातील लोकांनी बघाव्यात, अशी हुरहूर मनात राहायची. पण बदलत्या काळात खरेदीचे स्वरूपही बदलले आहे. सुरुवातीला पुस्तके, अ‍ॅक्सेसरीज यापुरती असलेली ही आॅनलाईन खरेदी आता मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागिने यांच्यापर्यंत पोहोचली आहे. अनेकांना आॅनलाईन ‘गर्दी’मुळे निराश व्हावे लागत आहे. एकीकडे आपण प्रत्यक्ष न बघताही कपडे खरेदी करायला सरावतोय. त्याच वेळी पारंपरिक दुकानांची बाजारपेठ मात्र वेगळा शॉपिंगचा अनुभव द्यायला तयार झाली आहे. एकूणच आॅनलाईन शॉपिंगला ग्राहक सराईत झाल्यामुळे दिवाळीच्या शॉपिंग अनुभवात यंदा मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. वस्तू प्रत्यक्षात न बघताही ग्राहक त्या आॅनलाईन खरेदी करीत आहेत. आॅनलाईनवरून खरेदी केलेली वस्तू योग्य दर्जाचीच असेल, असा विश्वास ग्राहकांना वाटू लागल्यानेच अनेक वेबसाईट कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. हा ट्रेंड भारतात बराच रुजू लागल्याने अनेक वस्तू प्रत्यक्षात न बघता आॅनलाईनवर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. हा अनुभव आणखी बदलेल यात शंका नाही.

Web Title: Shopping trends are changing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.