दुकाने बंद, रस्ते-बाजारपेठा ओस : नागपूरकरांनी पार पाडली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:11 AM2021-02-28T00:11:01+5:302021-02-28T00:12:34+5:30
Shops closed, roads and markets empty शनिवारी पहिल्याच दिवशी नागपुरातील बहुतांश भागातील परिस्थती पाहिली, तर रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले. दुकाने बंद होती. रस्ते-बाजारपेठा ओस पडल्या होत्या. एकूणच नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला व ‘मी जबाबदार’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात वाढत्या कोराेनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयांसह विविध आस्थापने व दुकाने आदी सर्व बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. हा लॉकडाऊन नसून नागरिकांनीच स्वत:हून आपली जबाबदारी समजून हा बंद पार पाडावयाचा होता. यासाठी राज्य सरकारने ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरू केली आहे. यामुळेच बंद दरम्यान पोलीस रस्त्यांवर होते. परंतु नागरिकांसाठी मात्र कुठलीही सक्ती करण्यात आलेली नव्हती. शनिवारी पहिल्याच दिवशी नागपुरातील बहुतांश भागातील परिस्थती पाहिली, तर रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले. दुकाने बंद होती. रस्ते-बाजारपेठा ओस पडल्या होत्या. एकूणच नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला व ‘मी जबाबदार’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
शनिवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने बंद होती. काही अपवादात्मक ठिकाणी सकाळी हॉटेल सुरू होते. परंतु दुपार होताच तेही बंद झाले. शहरातील बर्डी, महाल, गांधीबाग, सदर, गोकुळपेठ, सक्करदरा आदी मुख्य बाजारपेठा शनिवार व रविवारी हाउसफुल्ल असतात. पाय ठेवायलाही जागा नसते. शनिवारी हे सर्व मार्केट ओस पडले होते. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडली तर सर्व बंद होते.
शहरात कापड व्यवसाय, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, लोखंड आदी बाजार पूर्णपणे बंद होते. शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. बहुतांश ठिकाणी बंदसारखीच परिस्थिती होती. पोलीस व मनपा अधिकारीही रस्त्यावर उतरले होते. ज्या दुकानांना परवानगी नाही, अशांविरुद्ध कारवाई केली जात होती. नागरिकांना मात्र कुठलीही सक्ती केली जात नव्हती. अशा परिस्थितीतही नागरिकांनी आज विनाकारण घराबाहेर न पडता आपली जबाबदारी पार पाडली.
दारूची दुकाने बंद राहणार
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी बंद दरम्यान वाईन शॉप बंद राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही शहरासह जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू होती. परिणामी, पालकमंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासनाकडून हरताळ फासल्याचे दिसून आले. यासंदर्भात दारू दुकानदारांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी आदेश आले नसल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी दारूची दुकाने सुरू असल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात होते. गरिबाची चहा टपरी बंद, मात्र दारू दुकान सुरू असल्याबाबत नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली. या सर्व घटनाक्रमांमुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सायंकाळी आदेश जारी करीत रविवारी सर्व प्रकारच्या दारूची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले. या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नागपूर शहरात शनिवार व रविवार कोरोना संसर्ग काळामध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. उद्या रविवारी दारूची दुकानेदेखील बंद राहतील. यापुढे ज्यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे बंदचे आवाहन करण्यात येईल त्यावेळी दर शनिवार-रविवार दारूविक्रेत्यांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवावीत, असे स्पष्ट केले आहे.