रात्री ७ नंतरही दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:15+5:302021-07-16T04:08:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी राज्य शासनाने काही नियमांचे पालन करणे सक्तीचे केले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी राज्य शासनाने काही नियमांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने राेज सायंकाळी ४ वाजता बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, माैदा शहरात या उपाययाेजनांचा फज्जा उडविला जात असून, बहुतांश दुकाने रात्री ७ नंतरही सुरूच असतात. या प्रकाराकडे स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
टाळेबंदी काळात उद्याेगधंदे ताेट्यात गेले. त्याचा फटका दुकानदारांसह इतर उद्याेजकांनाही बसला. जूनपासून काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात झाल्याने राज्य शासनाने टाळेबंदीचे काही नियम शिथिल केले. त्यातच काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही व्यक्त केली जात असून, दुसऱ्या लाटेतील काही रुग्ण अधूनमधून आढळून येत आहेत.
माैदा शहर राष्ट्रीय महामार्गालगत वसले असल्याने या भागातून राेज शेकडाे लाेकांची ये-जा सुरू असते. औद्याेगिक परिसरामुळे बाहेरील नागरिकांचाही सतत राबता असताे. संक्रमण कमी झाल्याने मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. त्यातच राज्य शासनाच्या निर्देशानुसार दुकाने राेज सायंकाळी ४ वाजता बंद करणे बंधनकारक असताना दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांची दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत उघडी ठेवतात. यावर स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
...
उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश
काेराेनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांनी शुक्रवारी (दि. ९) आढावा बैठक घेतली हाेती. यात श्याम मदनूरकर यांनी तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून नगर पंचायतच्या हद्दीतील सर्व व्यावसायिकांना दर १५ दिवसांनी त्यांचा काेराेना चाचणी करणे व रिपाेर्ट प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. या सूचनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनावर साेपविली हाेती. मात्र, प्रशासनाला या सूचनेचा विसर पडल्याचे दिसून येते.