नागपुरात दुकाने सुरू, पण गर्दीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:56 PM2020-05-14T20:56:01+5:302020-05-14T21:09:23+5:30

नागपूर महापालिकेने लॉकडाऊनमधून काही व्यवसायांना शिथिलता दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी ऑटो स्पेअर पार्ट अ‍ॅण्ड रिपेअर शॉप, ऑईल आणि ल्युब्रिके न्ट शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी, होजियरी शॉप सुरू काही भागात सुरू झाले.

Shops open in Nagpur, but not crowded | नागपुरात दुकाने सुरू, पण गर्दीच नाही

नागपुरात दुकाने सुरू, पण गर्दीच नाही

Next
ठळक मुद्देग्राहकांना केले मास्क बंधनकारक : कापडाच्या दुकानात शारीरिक अंतराचे पालन दिसून आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेने लॉकडाऊनमधून काही व्यवसायांना शिथिलता दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी ऑटो स्पेअर पार्ट अ‍ॅण्ड रिपेअर शॉप, ऑईल आणि ल्युब्रिके न्ट शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी, होजियरी शॉप सुरू काही भागात सुरू झाले. परंतु आयुक्तांनी ही दुकाने सुरू करण्यासंदर्भात काही अटीसुद्धा घालून दिल्या. त्यात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागतील. शारीरिक अंतर, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. गुरुवारी शहरातील काही भागात ही दुकाने सुरू झाली. मात्र लोकांची गर्दी दिसून आली नाही. अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या पुढे दोरी लावून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. काही दुकानांवर ग्राहकांना मास्क बंधनकारक केले. काही दुकानदारांनी शारीरिक अंतर ठेवण्यासाठी दुकानांसमोर विशिष्ट सर्कलदेखील तयार केले. पण ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही.



सीताबर्डी
सीताबर्डी मेन रोडवरील होजियरीची काही दुकाने सुरू होती. या दुकानदारांनी दुकानासमोर दोरी बांधून ठेवली होती. काही दुकानात फक्त मालक तर काही दुकानात मालकासोबत एखादा नोकर होता. तोंडावर मास्क होता आणि दुकानापुढे मास्क लावणे बंधनकारक केले होते.

कॉटनमार्केट
कॉटनमार्केट परिसरातील सुभाष रोडवर बियाणे आणि खतांची दुकाने सुरू होती. या दुकानदारांनीही दुकानासमोर दोरी बांधली होती. काहींनी सॅनिटायझरही ठेवले होते. गर्दी होऊ नये म्हणून एका कर्मचाऱ्याला बाहेर उभे केले होते. पण येथेही फार गर्दी दिसून आली नाही.

मेडिकल चौक
क्रीडा चौक ते मेडिकल चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑटो स्पेअर पार्ट आणि रिपेअर शॉप आहेत. रिपेअर शॉपमध्ये मालक आणि एक-दोन कर्मचारीच उपस्थित होते. रिपेअरसाठी गाड्यांची फार गर्दी नव्हती. पण दुकानदारांनी गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या.

मानेवाडा रोड
मानेवाडा रोडवरील काही होजियरी शॉप सुरू झाले होते. काही तुरळक ग्राहकही दुकानात दिसून आले. दुकानदार स्वत: मास्कचा वापर करीत होते. तर ग्राहकही मास्क लावून खरेदी करीत होते.

इतवारा
इतवारा येथील बहुतांश मार्केट बंद होते. होजियरी मार्केटमध्येही शुकशुकाट होता. काही दुकाने सुरू झाली मात्र साफसफाईचे काम सुरू होते. इतवारा परिसरात ग्राहक दिसून आले नाहीत.

गांधीबाग
गांधीबागेतील कपडा मार्केटसुद्धा बंद होते. गुरुवारी अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत. रस्त्यावर शुकशुकाट होता. ग्राहकसुद्धा खरेदी करण्यासाठी बाहेर पडले नव्हते.

महाल
महालातील गांधीगेटच्या रस्त्यावरील ऑप्टिकलची दुकाने सुरू झाली होती. दुकानदारांनी मास्क बंधनकारक केले होते. पण ग्राहकच नव्हते. कोतवाली पोलीस स्टेशनच्या रोडवरील कपड्यांची व होजियरीची सर्व दुकाने बंद होती. वाहने दुरुस्तीची दुकाने सुरू होती मात्र गर्दी नव्हती.

सक्करदरा
सक्करदरा चौकातील होजियरी आणि कपड्यांची दुकाने सुरू होती. काही दुकानदारांनी ग्राहकांना मास्क बंधनकारक केले होते. पण दुकानात शारीरिक अंतर ठेवले जात नव्हते. ग्राहक कमी असले तरी शारीरिक अंतराचे पालन होत नव्हते. काही दुकानात कर्मचारी नियमित दिसून आले. पण अनेक कर्मचाऱ्यांनी मास्क लावले नव्हते. काही दुकानांपुढे दोरीसुद्धा बांधण्यात आली होती.

खामला
लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या अगदी पहिल्याच दिवशी खामला परिसरातील नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्ससारख्या नियमांचा विचारच केला गेला नाही. दुकानदारांनीसुद्धा पुरेशी काळजी घेतली नाही. प्रशासनाने टाळेबंदीमध्ये शिथिलता आणून दुकानदारांना दिवस वाटून दिले आहेत. यात ऑप्टिकल्स, स्टेशनरी, ऑटो स्पेअर पार्ट, रिपेअर, टायर, ऑईल आणि लुब्रिके टिंग या व्यावसायिकांना गुरुवार हा दिवस दिला आहे. प्रत्यक्षात या दुकानांव्यतिरिक्त अन्य दुकानदारही आपली दुकाने उघडून ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसले. ज्या दुकानदारांनी नियमात राहून दुकान उघडले त्यांनीही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क अशा कसल्याही अटींची पुरेशी पूर्तता केली नसल्याचे दिसून आले. ग्राहकांकडून शारीरिक अंतरदेखील राखले जात नव्हते.

श्रद्धानंदपेठ, अभ्यंकरनगर, धरमपेठ

श्रद्धानंद पेठेमध्ये अगदी तुरळक दुकाने सुरू होती. या भागात नियमांचे बऱ्यापैकी पालन सुरू दिसले. अशीच स्थिती रामनगर चौक परिसरातदेखील होती. या ठिकाणीही नियम पाळून दुकाने सुरू दिसली. अभ्यंकरनगर, धरमपेठ, या भागातदेखील शिथिल झालेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे बऱ्यापैकी पालन होताना दिसले.

स्टेशनरीच्या दुकानात गर्दी
मागील दोन महिन्यापासून शाळा पूर्णत: बंद असली तरी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. त्यामुळे शहरात आज उघडलेल्या काही विशिष्ट भागातील स्टेशनरीच्या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची बऱ्यापैकी गर्दी दिसली. अनेक विद्यार्थी नोटबुक, पेन यासारख्या जुजबी वस्तू खरेदी करताना दिसून आले. अनेक पालकांनी वर्क फ्रॉम होमसाठी कोरे पॅडसुद्धा खरेदी केलेले दिसले.

ऑटो रिपेअर सेंटरवर गदी

आज पहिल्याच दिवशी काही विशिष्ट भागात ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानात आणि रिपेअर सेंटरमध्ये वाहनधारकांची गर्दी दिसली. दुरुस्तीला आलेल्या अनेक दुचाकी या दुकानात या दुरुस्ती केंद्रासमोर उभ्या होत्या. मात्र येथेही कोणीच नियम पाळत नसल्याचे दिसून आले.

Web Title: Shops open in Nagpur, but not crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.