पाहुण्या पक्ष्यांनी बहरला उमरेड परिसरातील तलावांचा किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:17 PM2020-12-21T12:17:35+5:302020-12-21T12:18:00+5:30

Nagpur News Birds पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ उमरेड परिसरातील शिवापूर, लोहारा, पारडगाव, उकरवाही आदी तलावांच्या किनारी यंदा मोठ्या प्रमाणावर नजरेस पडत आहे.

The shores of the lakes in the Umred area were visited by visiting birds | पाहुण्या पक्ष्यांनी बहरला उमरेड परिसरातील तलावांचा किनारा

पाहुण्या पक्ष्यांनी बहरला उमरेड परिसरातील तलावांचा किनारा

Next
ठळक मुद्देनजरेत भरणारे अन् डोळ्यात साठविणारे पक्ष्यांचे थवे

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: चिमण्यांची चिवचिवाट, पाखरांचा किलबिलाट, पक्ष्यांचे थवे अन् त्यांची मंजुळ गाणी आता भरवस्तीत उरली नाही. ‘गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी’ असाच काहीसा तक्रारीचा सूर अलीकडे ऐकावयास मिळतो. त्यातच हिवाळ्यात थंडीची चाहूल लागताच आणि गुलाबी बोचऱ्या थंडीची शिरशिरी सुरू होताच पाहुण्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने नदी, तलाव, सरोवरे मस्तपैकी बहरतात. अशीच पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ उमरेड परिसरातील शिवापूर, लोहारा, पारडगाव, उकरवाही आदी तलावांच्या किनारी यंदा मोठ्या प्रमाणावर नजरेस पडत आहे. नजरेत भरणारे अन् डोळ्यात साठविणारे विदेशी पक्ष्यांचे थवे पक्षिप्रेमींना आकर्षित करीत आहेत.

काश्मीरच्या खोऱ्यातून तर दक्षिणेच्या कर्नाटकातून आलेल्या अनेक स्थलांतरीत पक्ष्यांचा ठिय्या दरवर्षी या परिसरात दिसून येतो. यंदाच्या मोसमात या पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. पांढऱ्या डोक्यावर दोन काळे पट्टे, शरीर करड्या रंगाचे, मानेवर आकर्षक पट्टे अशी निसर्गसौंदर्याची किनार असलेले बार हेडेड गुज (पाणबदक) या परिसरात दिसून येत आहेत.

आकाराने बदकाएवढे, पिसाऱ्यावर खवल्यासारखी पिवळट व गडद उदी रंगाची चिन्हे असलेले घनवर (स्पॉट बिल्लेड डक) पक्षीसुद्धा नजरेस पडत आहेत. या पक्ष्यांची नर-मादीची जोडी सारखीच दिसते. बदकापेक्षा लहान आकार असलेला बाड्डासुद्धा मोठ्या प्रमाणावर याठिकाणी आढळतो. मादा लाल चोचीचा आणि मादी गुलाबी चोच असलेला शेंद्र्या बड्ड्यासुद्धा जोडीने, थव्याने मनसोक्त विहार करतानाचे दर्शन या तलावांमध्ये भुरळ पाडणारेच ठरते.

सरगे बदक (पिनटेल बदक), खंड्या, जांभळी पाणकोंबडी, लहान-मोठा पाणकावळा, राखी कोहकाळ (ग्रे हेरॉन), जांभळा कोहकाळ (पर्पल हेरॉन), घोगल्या फोडा (एशियन ओपन बील स्टॉर्क) आदींसह विविध प्रकारचे पक्षी या निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पाडतात.

थंडीच्या हुडहुडीत माणसांची चाहूल लागताच तलावातून अलगद झेप घेणाऱ्या शेकडो पक्ष्यांची किलबिल आणि पखांची सुमधूर फडफड असा संपूर्ण नजारा अद्भूत निसर्ग सौंदर्याची अनुभूतीच देणारा ठरतो, अशा प्रतिक्रिया पक्षिप्रेमींकडून व्यक्त होत असून, ते मनसोक्त आनंद घेत आहेत.

१०-१२ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम या परिसरात असतो. नद्या आणि तलाव परिसरात फेब्रुवारी अंतिम ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्कामी असतात. उन्हाळ्याची चाहूल लागताच ते परतीच्या प्रवासाला निघतात.

- नितीन राहाटे, पक्षिप्रेमी, उमरेड

Web Title: The shores of the lakes in the Umred area were visited by visiting birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.