धाप लागतेय; सीबीसी चेक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 08:00 AM2023-03-24T08:00:00+5:302023-03-24T08:00:01+5:30
Nagpur News थकवा जाणवणे किंवा धाप लागत असलेतर, ‘सीबीसी’ ही रक्त तपासणी करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नागपूर : अनेकदा ॲनिमिया म्हटले की महिलांकडे बोट दाखवले जाते. मात्र, वास्तविक महिला-पुरुष दोन्ही घटकात ॲनिमियाचे प्रमाण वाढते आहे. बदललेली जीवनशैली आणि आहाराकडे होणारे दुर्लक्ष ही याची प्रमुख कारणे आहेत. यावर प्रतिबंध करायचा असेल तर आहारात समतोल राखला पाहिजे. थकवा जाणवणे किंवा धाप लागत असलेतर, ‘सीबीसी’ ही रक्त तपासणी करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
-ॲनिमिया म्हणजे काय ?
शरीरातील सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणारा ऑक्सिजन ज्या लाल रक्तपेशींमधून मिळतो, त्या लाल रक्तपेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजे ॲनिमिया होय. हा आजार दुर्धर वाटत नसला तरी प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बिघाड आहे, हे लक्षात येते.
-ॲनिमियाची विविध कारणे कोणती ?
लोहाची कमतरता हे सर्वात सामान्य कारण आहे. मूळव्याधीमुळे रक्तस्त्राव, मासिक पाळीत होणारा अधिक रक्तस्राव, गॅस्ट्रायटिस किंवा अल्सरमुळे पोटात होणार मंद रक्तस्त्राव याला कारणीभूत ठरतात.
-ॲनिमियाची लक्षणे
छातीत धडधड होणे, थकवा जाणवणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, केस लवकर पांढरे होणे, केस लवकर गळणे, जास्त वेळ एकाग्रतेने काम न करता येणे ही ॲनिमियाची लक्षणे आहेत. ही लक्षणे गंभीर वाटत नसली तरी दुसऱ्या एखाद्या आजाराची सुरुवात असू शकते.
-३ टक्के गर्भवतींमध्ये ॲनिमिया
मनपाच्या आरोग्य विभागानुसार, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ यादरम्यान शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ४८,०९४ गर्भवती महिलाची ‘सीबीसी’ ही रक्त तपासणी करण्यात आली. यातील ३ टक्के म्हणजे, १,४८५ गर्भवतींमध्ये ॲनिमिया आढळून आला. जिल्हा आरोग्य विभागाने मागील दोन महिन्यांत ‘एचएलएल’ कंपनीने तपासलेल्या ‘सीबीसी’ नमुन्यांची संख्या व त्यातून निष्पन्न झालेल्या ॲनिमयाग्रस्तांची संख्या, ही माहिती उपलब्ध करून दिली नाही.
- मुलांमध्ये अशक्तपणाचे काय ?
सिकलसेल, थॅलेसेमिया, ‘जी ६ पीडी’ची कमतरता आणि ‘हुक वर्म’च्या संसगार्मुळे ॲनिमिया होऊ शकतो. मुलांमध्ये क्रॉनिक ॲनिमिया हा त्यांचा वाढ आणि विकासात अडथळा आणू शकतो, म्हणून त्यांचे मूल्यांकन आणि त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.
-ॲनिमियावर स्वत:हून औषधी घेऊ नये
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात ॲनिमिया दिसून येतो. या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे, अयोग्य आहार. यामुळे लोह व ‘व्हिटॅमिन बी-१२’ची कमी होते. प्रत्येक ॲनिमियाचे कारण म्हणजे लोहाची कमी असेही नाही. तर तो कॅन्सरही असू शकतो. ॲनिमियासारखी लक्षणे दिसल्यास स्वत:हून औषधी घेऊ नये. योग्य डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. याशिवाय नियमित पोषक आहार घेतला पाहिजे. विशेषत: शाकाहार घेणाऱ्यांनी आपले ‘व्हिटॅमिन बी-१२’ तपासत राहायला हवे. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांनाही ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे या रुग्णांनीही आपली तपासणी करत राहायला हवी.
- डॉ. रिया बालीकर, हिमॅटोलॉजिस्ट