मनपाच्या ‘कॅशलेस’ला अल्प प्रतिसाद

By admin | Published: December 29, 2016 02:40 AM2016-12-29T02:40:23+5:302016-12-29T02:40:23+5:30

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडली आहे.

Short response to MMC's cashless | मनपाच्या ‘कॅशलेस’ला अल्प प्रतिसाद

मनपाच्या ‘कॅशलेस’ला अल्प प्रतिसाद

Next

संकल्प कॅशलेसचा, व्यवहार नगदीचाच
नागपूर : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडली आहे. याला प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाने कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल सुरू केलेली आहे. कं त्राटदारांची बिले व नगरसेवकांचे मानधन आरटीजीव्दारे बँकेत भरले जात आहेत. रोखीचे किरकोळ व्यवहारही बंद करण्यात आलेले आहेत. कर भरण्याची यंत्रणा कॅशलेस करण्यासाठी सर्व झोन कार्यालये व मुख्यालयात स्वाईप यंत्रे लावण्यात आलेली आहेत. परंतु चार ते पाच टक्के कर यातून जमा होत आहे. नागरिकांची आजही रोखीच्याच व्यवहाराला पसंती असून स्वाईप व आॅनलाईनला अल्प प्रतिसाद आहे. (प्रतिनिधी)

झोनमध्ये रोखीचेच व्यवहार
महापालिकेच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोन कार्यालयात स्वाईप यंत्रे लावण्यात आलेली आहेत. परंतु या यंत्राचा वापर होत नाही. मंगळवारी झोनमध्ये स्वाईप यंत्राची सुविधा नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. येथे रोखीनेच कर भरला जात असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले.
आॅनलाईनला प्रतिसाद वाढला
कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आॅनलाईन कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे गेल्या काही महिन्यात आॅनलाईन कर भरण्याला प्रतिसाद वाढला आहे. गेल्या महिनाभरात मालमत्ता कराच्या वसुलीपैकी १५ टक्के कर आॅनलाईन जमा करण्यात आला आहे.

धनादेशाव्दारे कर भरण्याची सुविधा
महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयात स्वाईप मशीनची सुविधा आहे. तसेच मालमत्ता कराची रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारली जात आहे. यापूर्वी १ हजारापेक्षा अधिक रक्कम असेल तरच धनादेश स्वीकारला जात होता. परंतु आता कितीही रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आॅनलाईन १५ टक्के तर व स्वाईप यंत्राच्या माध्यमातून ५ टक्के वसुली होत आहे.
मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त (एलबीटी विभाग)

ओसीडब्ल्यूची स्वाईप बसविण्याची तयारी
शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर(ओसीडब्ल्यू)ची झोन स्तरावर कार्यालये आहेत. या ठिकाणी नवीन वर्षात स्वाईप यंत्रे बसविण्यात येणार आहे. सध्या मात्र रोखीनेच पाणीपट्टी स्वीकारली जात आहे. सोबतच आॅनलाईन पाणीपट्टी भरण्याची ही सुविधा आहे.
सचिन द्रवेकर , जनसंपर्क अधिकारी, ओसीडब्ल्यू

Web Title: Short response to MMC's cashless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.