उमरेड विभागातील प्रकल्पात अल्प जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:35+5:302021-07-10T04:07:35+5:30
उमरेड : मागील अनेक दिवसांपासून दडी मारल्यानंतर उमरेड विभागात या मोसमात पहिल्यांदाच गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. पावसाच्या 'एन्ट्री'ने ...
उमरेड : मागील अनेक दिवसांपासून दडी मारल्यानंतर उमरेड विभागात या मोसमात पहिल्यांदाच गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. पावसाच्या 'एन्ट्री'ने सारेच सुखावले असले तरी अद्यापही उपविभागातील प्रकल्पात जलसाठा अल्प आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील एकूण २७ प्रकल्पांपैकी केवळ एकमेव पिरावा तलावात १०० टक्के जलसाठा झाला आहे. अन्य तलावात ठणठणाट दिसून येत असून मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच झाल्याचे चित्र आहे. विभागात मकरधोकडा, सायकी आणि पांढराबोडी हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीन तलावांपैकी मकरधोकडा प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. या तलावाच्या माध्यमातून सिंचन तसेच उमरेडकरांची तहान भागविली जाते. यामुळे या तलावात जलसाठा चिंताजनक आहे. सायकी प्रकल्पात सुद्धा केवळ ६.५० टक्के जलसाठा असून पांढराबोडी प्रकल्प ४७.६० टक्केच भरला आहे. उर्वरित लघु प्रकल्पांपैकी नवेगाव आणि निशाणघाट याठिकाणी सुद्धा जलसाठा शून्य टक्केच आहे. विभागातील बोटेझरी प्रकल्पात ५०.७२ टक्के जलसाठा आहे. चिचाळा (१४.६६), (२६.९०), गोठणगाव (२८.६५), करांडला (७४.३३), उरकुडापार (८.२५), वणी (७०.६० टक्के), नांदेरा (२१.७२), चनोडा (०.६५), पारडगाव (१६.८४), खापरी (४३.४७), उकरवाही (२०.०५), वडेगाव (१२.८२), वडद (७.९५), मटकाझरी (११.४२), उंदरी (२०.५३), सिर्सी (२४.१८), ठाणा (७९.८४), जवळी (३०.४) तसेच भिवापूर प्रकल्पात केवळ २४.१९ जलसाठा आहे. एकूणच काही भागात पाऊस झाला तर काही भागात अजूनही पाऊस पाहिजे तेव्हढा बरसला नाही. यामुळेच बहुतांश तलावाची अवस्था जलसाठ्याबाबत दयनीय आहे. अनेक वर्षांपासून तलावांच्या खोलीकरणाची मागणी धूळखात आहे. यामुळे तलावातील गाळ व खोलीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. गाळमुक्त तलाव योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास नक्कीच जलव्यवस्थापन सुधारेल, असे बोलल्या जात आहे.
---------------------------------------
पर्जन्यमापक यंत्र का नाही?
उमरेड उपविभाग हा तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात तब्बल २७ प्रकल्प आहेत. यापैकी केवळ पांढराबोडी, मकरधोकडा, सतीघाट, नवेगाव, कऱ्हांडला, निशानघाट, वणी, नांदेरा या एकूण केवळ ८ प्रकल्पात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. अन्य प्रकल्पात हे यंत्रच नाहीत. बऱ्याच वर्षांपासून ही मागणी शासन दरबारी धूळखात पडलेली आहे. पर्जन्यमान मोजण्यासाठी यंत्र का नाही, असा सवाल विचारला जात आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय, अशीही विचारणा केली जात आहे.
---
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे, असेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे.