भिवापूर तालुक्यात डीएपीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:43+5:302021-06-16T04:11:43+5:30
शरद मिरे भिवापूर : पाऊस समाधानकारक असल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे. अशातच तालुक्यात डीएपीचा तुटवडा जाणवू लागल्याने ...
शरद मिरे
भिवापूर : पाऊस समाधानकारक असल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे. अशातच तालुक्यात डीएपीचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून डीएपी कुठे आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने कृषी केंद्र चालकांच्या गोदामातही डीएपीचा ठणठणाट आहे.
तालुक्यात युरिया ७८० टन उपलब्ध झाला. त्यापैकी सध्या १७४ टन वेगवेगळ्या कृषी केंद्रात उपलब्ध आहे. डीएपी २८० टन उपलब्ध झाले. त्यापैकी केवळ १० टन शिल्लक असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र ते कुठे आणि कोणत्या कृषी केंद्राकडे उपलब्ध आहे हे कृषी केंद्र चालकांच्याही ध्यानीमनी नाही. एमओपी ९० टन उपलब्ध पैकी ४५ टन शिल्लक आहे. एसएसपी जी १,९५५ टन पैकी ८२० टन शिल्लक आहे. एसएसपी ४०० पैकी ८५ टन शिल्लक आहे. एमआयएक्स ११५ पैकी ६५ टन उपलब्ध आहे. बियाणांच्या बाबतीत सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ५,८३० क्विंटल सोयाबीन बियाणांचा पुरवठा झाला. त्यापैकी सद्यस्थितीत २०९ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. कपाशी २९,८६० पैकी १४,७७२ शिल्लक आहे. मिरची १५१ किलो पैकी ६५ किलो शिल्लक आहे. एकंदरीत ही आकडेवारी बघता तालुक्यात डीएपीचा तुटवडा निर्माण झाला असून येत्या दिवसात सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
हे आहे मुख्य कारण
हवामान खात्याचा अंदाज समाधानकारक असल्यामुळे तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने आधीच डीएपीची खरेदी करत घरात साठवणूक करून ठेवल्याचे समजते. यातूनही डीएपीचा तुटवडा निर्माण झाल्याचा अंदाज कृषी केंद्र चालकांनी व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे शासनाने सबसिडी जाहीर केल्यामुळे सरसकट दराबाबतच्या तांत्रिक कारणामुळेसुद्धा डीएपी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याचे वृत्त आहे.
आठवडाभरात ‘रॅक’लागणार
यासंदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, तालुक्यात डीएपीचा तुटवडा आहे. ही बाब सत्य असली तरी या आठवड्यात डीएपीची रॅक लागणार असून तालुक्याला मुबलक प्रमाणात डीएपी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, १५ जुलैपर्यंत पेरणी करता येणार आहे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.