भाव आहे, पण विकायला तूर नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:11 AM2024-05-04T11:11:20+5:302024-05-04T11:15:49+5:30
उत्पादनात घट : १६ लाख टनाचा तुटवडा, ८ लाख टन आयातीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपये दर मिळत आहे. हे दर दबावात आणण्यासाठी व आवक वाढविण्यासाठी बाजारात सायकॉलॉजिकल प्रेशर तयार केले जात आहे. देशात उत्पादन घटल्याने यंदा १६ लाख टन तुरीचा तुटवडा जाणवणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी किमान ८ लाख टन तुरीची आयात होण्याची शक्यता असून, समांतर दरामुळे ही आयात महागात पडणार असल्याने दरावर फारसा परिणाम होणार नाही. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार स्टॉक लिमिटवर भर देत आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्ष २०२३-२४ च्या हंगामात ४३ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. वास्तवात, उत्पादन ३० लाख टन झाले असून, देशाची वार्षिक गरज ही ४६ लाख टन तुरीची आहे. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.
दर पाडणे कठीण
आयात करून देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवरील आयात शुल्क रद्द केले असून, आयातीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मोझांबिक, म्यानमार व मलावी या देशांनी भारताला कमी दरात तूर विकत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आयात थांबली आहे. त्यामुळे सरकारने स्टॉक लिमिटवर भर दिला असला तरी डाळींच्या जागतिक बाजारातील तेजीमुळे केंद्र सरकारला देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडणे कठीण जात आहे. जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा ७० टक्के असून देशात कर्नाटक व महाराष्ट्राचा वाटा ५६.८० टक्के आहे.
आयात महाग
जागतिक पातळीवर सध्या तुरीचे दर ९,५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. भविष्यात हे दर कमी होण्याची शक्यता नाही.
पॅकिंग व वाहतूक खर्च विचारात घेता आयात केल्या जाणाऱ्या तुरीला किमान प्रतिक्चिटल १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
२०२३-२४ मध्ये भारताने ७.७५ लाख टन तूर आयात केली होती. चालू वर्षात अधिकाधिक ८ लाख टन आयात होऊ शकते.