आठवड्यापासून 'आरटीओ'त लायसन्स व आरसीचा तुटवडा
By सुमेध वाघमार | Published: May 29, 2023 12:29 PM2023-05-29T12:29:10+5:302023-05-29T12:29:51+5:30
स्मार्ट कार्डच संपले : वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
सुमेध वाघमारे
नागपूर : नागपूर शहर, ग्रामीण आरटीओ कार्यालयासह पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन परवाना (लायसन्स) व ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ (आरसी) स्मार्ट कार्डचा आठवड्यापासून तुटवडा पडला आहे. नवे स्मार्ट कार्ड येण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. यामुळे आरटीओ कार्यालयाच्या अडचणी वाढल्या आहेत, तर वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी सेवापुरवठादाराशी करार केला. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. नंतर सलग तीन वर्षे सेवापुरवठादाराची नेमणूकच केली नाही. यामुळे नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरुपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक दिले जात होते. २०१७ मध्ये ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला आरसी स्मार्ट कार्डची जबाबदारी दिली. आता या कंपनीशी राज्य परिवहन विभागाचा असलेला करार संपुष्टात आला. परंतु त्यापूर्वी विभागाने नव्या पुरवठादाराची नेमणूक केली नाही. यामुळे राज्यभरातील बहुतांश आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा पडला आहे.
- नव्या स्मार्ट कार्डसाठी १ जुलैची प्रतीक्षा
प्र्राप्त माहितीनुसार, स्मार्ट कार्डच्या पुरवठ्याचे कंत्राट आता कर्नाटक येथील मणिपाल टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार रोज किमान ४५ हजार स्मार्ट कार्ड परिवहन विभागाला मिळतील. त्याचे वितरण राज्यभरातील ५० आरटीओ कार्यालयांना होईल. परंतु नवे कार्ड येईपर्यंत १ जुलैपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
- नाव, पत्ता प्रिंटचे अधिकार तीनच आरटीओला
परिवहन विभागाने पहिल्यांदाच स्मार्ट कार्डवर वाहनधारकांचे नाव, पत्ता प्रिंट करण्याचे अधिकार स्थानिक आरटीओ कार्यालयांकडून काढून घेतले आहेत. आता है अधिकार राज्यातील केवळ तीनच आरटीओ कार्यालयांना असतील. यात पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
- वाहन परवाना, आरसी होणार स्वस्त
नवीन स्मार्ट कार्डमुळे वाहन परवाना ३०, तर आरसी ८ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या दुचाकी वाहन परवान्यासाठी ७६६ रुपये, तर दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यासाठी १,०६६ रुपये मोजावे लागतात. दुचाकी ‘आरसी’साठी शासनाचे शुल्क ३०० रुपये व स्मार्ट कार्डचे शुल्क २५०, असे ५५० रुपये, तर कारसाठी शासनाचे शुल्क ५५० रुपये व स्मार्ट कार्डसाठी २५०, असे ८०० रुपये द्यावे लागतात.
- ज्यांना गरज असेल त्यांना प्रमाणपत्र मिळेल
वाहन परवाना व आरसीचे स्मार्ट कार्डचा साठा सध्यातरी उपलब्ध नाही. लवकरच तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यादरम्यान ज्यांना परवाना किंवा ‘आरसी’ची गरज आहे, त्यांना तसे ‘पर्टिक्युलर’ म्हणजे संबंधित कागदपत्रांच्या तपशीलवार माहितीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल.
- रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर