उपराजधानीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:01 AM2019-11-11T11:01:52+5:302019-11-11T11:05:05+5:30

उपराजधानीवर डेंग्यूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरात डेंग्यूच्या ३००वर रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसाला २०० वर प्लेटलेट्सची मागणी होत असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

Shortage of platelets in Nagpur | उपराजधानीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स तुटवडा

उपराजधानीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स तुटवडा

Next
ठळक मुद्देडेंग्यूच्या रुग्णांकडून वाढली मागणीरोज लागत आहेत २०० वर प्लेटलेट्सखासगीत घेणे गरिबांना कठीण

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीवर डेंग्यूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरात डेंग्यूच्या ३००वर रुग्णांची नोंद झाली आहे, तर डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या हजाराच्या घरात गेली आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होते. परिणामी, प्लेटलेट्स या रक्तघटकाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढी मिळून दिवसाला २०० वर प्लेटलेट्सची मागणी होत असल्याने येत्या काही दिवसांत प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
परतीचा पाऊस डेंग्यूसाठी पोषक ठरल्याचे चित्र आहे. जागोजागी पाणी साचून राहिल्याने या डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूला कारणीभूत ठरणारा ‘एडीस इजिप्त’ नावाचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. याचे योग्य पद्धतीने नियंत्रण होत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्राप्त माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी डेंग्यूचे सरासरी दोन ते तीन रुग्ण सापडत होते. नोव्हेंबरमध्ये रुग्णांची ही संख्या प्रतिदिवस चार ते पाचवर गेली आहे. एकीकडे डेंग्यू वाढत असताना डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. या वाढीचा ताण प्लेटलेट्स पुरवणाऱ्या रक्तपेढ्यांना जाणवू लागला आहे. गेल्या २० दिवसांपासून प्लेटलेट्सच्या खपात कमालीची वाढ झाली आहे. खासगी रक्तपेढ्यांमध्ये पूर्वी दिवसाला १० ते १५ प्लेटलेट्सची मागणी होती आता ती वाढून ५० ते ६० वर गेली आहे.

‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’च्या मागणीत दुपटीने वाढ
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला ‘थ्रोम्बोसायटोपोनिया’ असे म्हणतात. जेव्हा ‘प्लेटलेट्स काऊंट १५० हजार प्रती मायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला ‘लो प्लेटलेट्स’ मानले जाते. अशावेळी रुग्णाला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ म्हणजे अनेक रक्तदात्यांच्या रक्तातून एकत्र केलेल्या प्लेटलेट्स दिल्या जातात. परंतु काही रुग्णांमध्ये या प्लेटलेट्समधून आवश्यक संख्या वाढत नाही यामुळे त्यांना ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ म्हणजे एकाच रक्तदात्याच्या रक्तातून दिलेले प्लेटलेट्स दिले जाते. सध्या या प्लेटलेट्सच्या मागणीतही दुपटीने वाढ झाल्याचे रक्तपेढींचे म्हणणे आहे.

शासकीय रक्तपेढीही अडचणीत
डागा या शासकीय रक्तपेढीत रक्तातून प्लेटलेट स्वतंत्र काढण्याची यंत्रणा नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी मेयो, मेडिकल किंवा खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागते. खासगीमध्ये याची किंमत गरीब रुग्णांना परडवणारी नसल्याने मेयो, मेडिकलवरच अनेकांची भिस्त आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण भरती आहेत. प्लेटलेट्सची गरज इतरही रुग्णांना असल्याने या रक्तपेढ्या अडचणीत आल्या आहेत.

रोज ५० वर प्लेटलेट्सचा पुरवठा
लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, पूर्वी दिवसाला साधारण १०ते १५ प्लेटलेट्स पिशव्यांची मागणी व्हायची परंतु आता ही संख्या ५० ते ६० वर गेली आहे. सध्या मागणीत अचानक झालेली वाढ हे डेंग्यूचेच निदर्शक आहे. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये किंवा रक्तदानाच्या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, असे आवाहनही डॉ. वरभे यांनी केले.

Web Title: Shortage of platelets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य