माेवाड येथे काेराेना प्रतिबंधक लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:12+5:302021-06-30T04:07:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. याला माेवाड (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रातील लसीकरण केंद्रही अपवाद नाही. मात्र, या केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असून, लसींचा पुरवठा मात्र कमी केला जात असल्याने अनेकांना आल्यापावली परत जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसींचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्याची मागणी तरुणांसह नागरिकांनी केली आहे.
माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्राला माेवाड शहरासह परिसरातील १३ गावे जाेडली आहेत. यात खैरगाव, बेलाेना व अन्य काही गावे लाेकसंख्येने माेठी आहेत. या आराेग्य केंद्रात राेज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांचे लसीकरण केले जाते. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत नागरिक उदासीन असल्याने प्रशासनाला माेठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागली. काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून बहुतांश नागरिक काेराेना प्रतिबंधक लसीबाबत सकारात्मक विचार करायला लागले. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
या लसीकरण केंद्राला राेज १०० लसी पाठविल्या जातात. मात्र, लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही राेज ४५० ते ६०० एवढी आहे. त्यामुळे राेज ३५० ते ५०० नागरिकांना लसीविना घरी परत जावे लागते. परत जाणाऱ्यांमध्ये ४५ वर्षांवरील लसीचा दुसरा डाेस घेणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे. दुसरा डाेस घेण्यासाठी नागरिकांना कालमर्यादा ठरवून दिली आहे. लस वेळेवर मिळत नसल्याने अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येत असल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेवरून निदर्शनास येते.
....
लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक
मध्यंतरी केंद्र व राज्य शासनाच्या आराेप-प्रत्याराेपांमुळे लसीकरण पूर्णपणे बंद हाेते. त्यातच शासनाने १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. काेराेना संक्रमणाची तिसरी लाट लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्राला राेज किमान ५०० लसींचा डाेस पुरविणे आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
...
जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला राेज १०० डोस दिले जात होते. आम्ही प्राप्त लसीनुसार लसीकरण करताे. लस घेणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. तुलनेत लसींचा साठा कमी मिळत असल्याने अनेकांना परत जावे लागते. जिल्हा आरोग्य विभागाकडे लसींच्या पुरेशा साठ्याची मागणी नाेंदविली आहे. लसींचा साठा उपलब्ध होताच तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रांना मागणीनुसार वितरित केला जाईल.
- डाॅ. विद्यानंद गायकवाड,
तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड