मानेतून काढली बंदुकीची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:33 AM2017-08-26T00:33:55+5:302017-08-26T00:34:13+5:30
मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला. २४ वर्षीय गोविंद पांडे याचा जीव धोक्यात आला होता. त्याच्या कंबरेखालील अवयवांची चेतना हरवली होती. जखमेतून सतत रक्त वाहत होते. कधी काहीही होऊ शकत होते. त्या अवस्थेत त्याला नागपुरात हलविले. आर्थाेपेडिक सर्जन डॉ. सुशील वैरागडे व बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. शिवाजी देशमुख यांनी शर्तीचे प्रयत्न केले. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून गोविंदला जीवनदान दिले.
उत्तर प्रदेश बहुराईच गाव येथील रहिवासी गोविंद पांडे (२४) २ आॅगस्ट रोजी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. याच वेळी इतर मुलांसोबत वाद झाला. सायंकाळी गोविंद आपल्या घरासमोर बसून असताना अचानक त्याच्यावर गोळीबार झाला. एक गोळी गोविंदाचा मानेत शिरली. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी उपचाराला नकार देत लखनौ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी प्रथमोपचार केला. परंतु गोळी काढायला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगून तीन-चार दिवस उपचार करून घरी पाठविले. ‘स्पायनल कॉड’ला भेदून गोळी गेल्याने गोविंदाच्या कंबरेखालचा भाग असंवेदनशील झाला होता. जखमेतून रक्तही वाहत होते. जीवाचा धोका निर्माण झाला होता. त्या अवस्थेत त्याला रेल्वेतून दीड दिवसांचा प्रवास करीत १३ आॅगस्ट रोजी नागपुरातील भगवाननगर रोड येथील आपुलकी वैरागडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
एमआरआरही अशक्य
डॉ. सुशील वैरागडे म्हणाले, गोविंदच्या मानेच्या कुठल्या भागात बंदुकीची गोळी आहे हे पाहण्यासाठी एक्स-रे व साध्या सिटी स्कॅन शिवाय पर्याय नव्हता. धातूची गोळी असल्याने एमआरआय करणे शक्य नव्हते. यामुळे शस्त्रक्रिया करणे आणखी गुंतागुंतीचे झाले होते. आम्ही हे आव्हान स्वीकारले. १५ आॅगस्ट रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे निश्चित केले.
धमणीला इजा पोहचण्याची होती शक्यता
मानेत बंदुकीची जिथे गोळी होती त्याच्या जवळून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमणी गेली होती. शस्त्रक्रियेवेळी धमणीला थोडी जरी ईजा झाली असती तर गोविंदाच्या जीवाला धोका होणार होता. बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी गोविंदाचा रक्तदाब कमी करण्यास मदत केली. तब्बल साडेतीन तास त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. अखेर तीन सेंटीमीटरची गोळी मानेतून बाहेर काढण्यात यश आले.
पाच महिन्यात तो चालू शकेल
शस्त्रक्रियेनंतर गोविंदाच्या कंबरेखालच्या अवयवांमध्ये चेतना यायला सुरुवात झाली. पाच दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. साधारण चार-पाच महिन्यात त्याच्या पायात ताकद येऊन तो पुन्हा चालू शकेल, असेही डॉ. वैरागडे म्हणाले.