तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीतून पुन्हा चालल्या गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 08:47 PM2021-01-28T20:47:22+5:302021-01-28T20:49:03+5:30
illegal fishing ,firing, crime news पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तोतलाडोह जलाशयात गुरुवारी २७ जानेवारीच्या रात्री पुन्हा गोळीबाराची घटना घडली. सात ते आठ बोटीतून मासेमारी करणाऱ्या पथकाचा वनविभागाच्या गस्ती पथकाने पाठलाग केला. त्यात गोळीबारही करावा लागला. अखेर एका अवैध मासेमारासह दोन बोटी पकडण्यात या पथकाला यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तोतलाडोह जलाशयात गुरुवारी २७ जानेवारीच्या रात्री पुन्हा गोळीबाराची घटना घडली. सात ते आठ बोटीतून मासेमारी करणाऱ्या पथकाचा वनविभागाच्या गस्ती पथकाने पाठलाग केला. त्यात गोळीबारही करावा लागला. अखेर एका अवैध मासेमारासह दोन बोटी पकडण्यात या पथकाला यश आले.
पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील तोतलाडोह जलाशयामध्ये २७ जानेवारीच्या रात्री सात ते आठ बोटींमधून काही व्यक्ती अवैध मासेमारी करीत असल्याचे विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या गस्ती पथकाला दिसले. पथकातील जवानांनी अवैध मासेमारी करणाऱ्या टोळक्याचा पाठलाग करून एका मासेमाऱ्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच पूर्व पेंच वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे अतिरिक्त मनुष्यबळासह घटनास्थळी दाखल झाले. देवलापारचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पुंजरवाड ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. वनपरिक्षेत्रातील कक्ष ५३० मधील एका निर्जन बेटावर मासेमारांनी आग लावल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी वन आणि पोलीस विभागाने विशेष मोहीम राबविली. मासेमारांकडून दगडफेक आणि हल्ला झाल्याने वन विभागाने हवेत गोळीबार केला.. रात्रभर चाललेल्या या संयुक्त मोहिमेत मासेमाऱ्यांचा पाठलाग करून दोन बोटीसह १५० जाळे जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या अक्रम शेख (न्यू तोतलाडोह वडांबा, ता. रामटेक) याच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला असून, प्रथम वर्ग न्यायालय, रामटेक यांनी त्यास तीन दिवसासाठी वनकोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.