बापरे, ही भक्ती म्हणावी की कोरोनाला कवेत घेण्यासाठी उसळलेली गर्दी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 06:56 PM2022-01-01T18:56:44+5:302022-01-01T18:59:18+5:30
Nagpur News नववर्षाच्या प्रारंभदिनी देवस्थानांमध्ये उसळलेल्या बेसुमार गर्दीने नागरिकांमधील बेपर्वाईपणा सिद्ध होत आहे.
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दोन जीवघेण्या लाटा अनुभवल्या असतानाही नागरिक जागरूक नसल्याचे दिसून येते. नववर्षाच्या प्रारंभदिनी देवस्थानांमध्ये उसळलेल्या बेसुमार गर्दीने नागरिकांमधील बेपर्वाईपणा सिद्ध होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट डोक्यावर थयथय नाचत असतानाही नागरिक बेलगाम असल्यासारखे वागत आहेत. कोरोना प्रोटोकॉलची धुळधाण उडवत असल्याचे चित्र प्रत्येक देवस्थानांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आपण सजग असल्याचे सांगणाऱ्या देवस्थान कमिटीही कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सपशेल अपयशी ठरल्या आहेत.
२०२१ वर्षाला निरोप दिल्यानंतर शुक्रवारी प्रत्येक धर्मीयांनी आपापल्या आराध्यांच्या स्थळी जाऊन दर्शन घेतले. नवे वर्ष सुख, संपन्नतेचे असावे.. अशी प्रार्थना प्रत्येकाने आराध्य देवतेपुढे केली. भगवंताच्या चरणी सुख-समृद्धीची मागणी करताना आवश्यक असलेले पथ्य पाळणे मात्र भाविकांनी टाळले. शहरातील प्रत्येकच देवस्थानांमध्ये उसळलेल्या गर्दीतून ही बाब स्पष्ट झाली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चुणूक दरदिवशी दुपटीने वाढत असलेल्या संक्रमितांवरून दिसायला लागली आहे. संक्रमणाच्या गेल्या दोन लाटा मार्च-एप्रिलमध्ये धडकल्या होत्या. मात्र, तिसरी लाट अनपेक्षितरित्या डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासूनच धडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढे स्थिती अवघड होईल, अशा शंकाही वर्तविल्या जात आहेत. याबाबत शासन-प्रशासन आपल्यापरीने नागरिकांना सजग करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, त्या प्रयत्नांना नागरिकांकडूनच दाद मिळत नसल्याने, अनायासे नागरिक स्वत:च शहराला लॉकडाऊनकडे नेत असल्याची स्थिती यावरून दिसून येते.
नागरिकांच्या या असावध भूमिकेमुळे नववर्षाच्या शुभप्रारंभी अशुभ अशा संक्रमणाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. देवतेपुढे, संतांपुढे ‘आपणच आपल्या आयुष्याचे व आरोग्याचे शिल्पकार’ अशी घोषणा देणाऱ्या नागरिकांच्या स्मृतीभ्रंशामुळे पुन्हा महामारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शहरातील श्री गणेश टेकडी मंदिर, वर्धा महामार्गावरील श्री साईबाबा देवस्थान, मोठा व छोटा ताजबाग, गुरुद्वारे, विहारे, चर्च आदींमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना व संबंधित देवस्थानांच्या व्यवस्थापकांना संकटाची चाहूलच नसल्याचे दिसून येते.
गर्दीपुढे टेकले हात
कोरोनामुळे माझे पती गेले. मी सुद्धा बाधित झाले होते. लोक समजदार आहेत आणि आज गर्दी नसणार म्हणून मी बाप्पाच्या दर्शनास आले होते. मात्र, गर्दी बघून मी बाहेरच थांबले आहे. गर्दीपुढे मी हात टेकल्याची भावना एक वृद्ध महिला भाविक श्री गणेश टेकडी मंदिर येथील व्यवस्थापकांना सांगत होती.
अनेकांच्या तोंडावरील मास्क गायब
देवस्थानांत येताना भाविकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. शिवाय, व्यवस्थापनाकडून निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित आहे. व्यक्तिश: अंतर तर पाळावेच लागेल, असे फलक लागले आहेत. मात्र, देवस्थानांत उसळलेल्या गर्दीवरून तर वारंवार निर्जंतुकीकरण दिसून येत नव्हतेच. भक्तांच्या चेहऱ्यावरील मास्क गायब झालेले होते. अनेकांचे मास्क हनुवटीला टांगलेले दिसून येत होते.
खेटून खेटून लांबच लांब रांगा
देवस्थानांमध्ये दर्शन व प्रसादासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमध्ये असलेले नागरिक एकमेकांना खेटून खेटून होते. अंतर कुणीच पाळत नव्हते.
.........