ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:10 AM2023-02-15T08:10:00+5:302023-02-15T08:10:02+5:30
Nagpur News अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : आनंद, दु:ख, राग, भीती आदी भावनांसारखीच प्रेमही एक भावना आहे. इतर भावना ज्याप्रमाणे निर्माण होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे प्रेमभावनेचेही आहे. मात्र, प्रेम करणारे काही जण या भावनांना समजून घेत नाही. ते कोणत्याही थराला जातात. विशेषत: प्रेमात अपयश आल्याचे पाहता आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसहित स्वीकार करणे. परंतु, बहुसंख्य प्रकरणांत तसे होताना दिसून येत नाही. दुसरीकडे, आपल्याला हीच प्रेयसी किंवा हाच प्रियकर हवा, याच भावनेने पछाडलेले असतात. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे यालाच प्राधान्य देतात. यासाठी काही जण कोणत्याही थराला जातात. यातूनच आत्महत्या, हत्या, तिचे जगणे नकोसे करणे आदी प्रकरणे समोर येतात. एकूणच भावना अनावर होत असल्याची लक्षणे ओळखल्यास व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास यातून बाहेर पडणे सहज शक्य असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- प्रेम दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मनोविकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, ‘‘प्रेम साधारण दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यानंतर परस्परांबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक संबंध आदी बाबी नातेसंबंध टिकवून ठेवतात. जिथे सकारात्मक स्थिती प्राप्त होत नाही, तिथे नैराश्यापासून ते आत्महत्येपर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्यांचे भाग उद्भवतात.”
-एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के प्रेम प्रकरणातील अपयशाचे
डॉ. सोमानी म्हणाले, ‘‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०२१ च्या अधिकृत उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के म्हणजे सुमारे ७५०० मृत्यू हे प्रेम प्रकरणातील अपयशाचे आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. तर, परीक्षेत अनुत्तीर्ण मृत्यू २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
-आत्महत्या करणारी व्यक्ती स्वत:चे मूल्यच विसरते
प्रेयसी किंवा प्रियकरासाठी जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ती नकळत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व किंवा मूल्यच विसरते. अशा व्यक्ती मुळात स्वत:वरही प्रेम करीत नाहीत.
-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख, मनोविकृतिशास्त्र विभाग, मेयो.