खांद्याचे दुखणे गंभीर आजाराचे लक्षण
By admin | Published: July 17, 2017 02:49 AM2017-07-17T02:49:24+5:302017-07-17T02:49:24+5:30
खांद्याच्या दुखण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. परंतु हे दुखणे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
सत्यजित जगताप यांची माहिती : ‘आॅर्थाेस्कोपी मीट’चा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खांद्याच्या दुखण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. परंतु हे दुखणे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन निदान केल्यास यावर यशस्वी उपचार करणे शक्य होते. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, खांदा निखळण्याची समस्या निर्माण होते. यातही वारंवार खांदा निखळण्याकडे दुर्लक्ष केल्यास शस्त्रक्रियेचा यशाचा दरही कमी होतो. या समस्येवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते, अशी माहिती आॅर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरचे अध्यक्ष व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सत्यजीत जगताप यांनी येथे दिली.
आर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरच्यावतीने आयोजित दोन दिवसीय ‘आर्थाेस्कोपी चिंतन’ बैठकीचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. जगताप म्हणाले, अनियमित जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे पाठीचे दुखणे आणि गुडघेदुखीचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.
त्यानंतर खांदा हा तिसऱ्या क्रमांकाचा हाडाशी निगडित आजार म्हणून पुढे येत आहे. खांद्याच्या मांसपेशी क्षतिग्रस्त झाल्यास, दुखणे असल्यास, हालचाली मंदावल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. यामुळे फाटलेल्या किंवा कमकुवत झालेल्या मांसपेशीवर उपचार करणे शक्य होते. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. गंभीर समस्या निर्माण झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात. अशावेळी उपचार करणे कठीण होते.
या परिषदेचे संयोजन सचिव डॉ. कुलदीप देशपांडे यांनी लिगामेन्ट (अस्थिबंधन) या विषयावर चर्चासत्रात मार्गदर्शन केले. आर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरचे सचिव डॉ. सतीश सोनार यांनी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओद्वारे प्रात्याक्षिक दिले. परिषदेचे सचिव डॉ. प्रशांत पराते व डॉ. मुकेश लढ्ढा यांनी विविध चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या दोन दिवसीय परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. प्रवीण अग्रवाल, डॉ. तेजस वाघेला, डॉ. नेहा गोडघाटे, डॉ. समीर द्विडमुथे, डॉ. साकेत मुंधडा, डॉ. अमित हाडोळे, डॉ. नाविद अहमद, डॉ. अभिनव भटनागर, डॉ. विक्रम सप्रे, डॉ. मनोज पहूकर, डॉ. सुयोग राठी, डॉ. अमोल पाटील, डॉ. विवेक मोरे व डॉ. राहुल डवरी आदींनी सहकार्य केले.