कारणे दाखवा नोटिशीची शिक्षकांना धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:50+5:302021-05-01T04:06:50+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणाची आधीच सर्वांच्या मनात धास्ती भरली असून दररोज होणाऱ्या शिक्षकांच्या मृत्यूंमुळे शिक्षक व त्यांचे ...
नागपूर : कोरोना संक्रमणाची आधीच सर्वांच्या मनात धास्ती भरली असून दररोज होणाऱ्या शिक्षकांच्या मृत्यूंमुळे शिक्षक व त्यांचे कुटुंबीय भीतीयुक्त वातावरणात आहेत. त्यात पुन्हा दुष्काळात तेरावा महिना म्हणजे शिक्षकांना शिस्तभंगाची, निलबंनाची, वेतनवाढ थांबविणे व वेतन कपात अशा कार्यवाहीच्या कारणे दाखवा नोटीस स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात येत आहेत. या नोटिशी शिक्षकांच्या मनात धडकी भरविणाऱ्या असून, प्रशासनाने त्या तत्काळ थांबवाव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात झाल्यापासून प्रशासनाने शिक्षकांची सेवा अधिग्रहीत केली. शिक्षकांना चेक पोस्ट, मद्यविक्रीचे दुकान, स्वस्त धान्याचे दुकान, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण जाणीव जागृती मोहिम, कंट्रोलरूम व अशा अनेक प्रकारच्या आरोग्य सर्वेक्षणात सहभागी करून घेतले. शिक्षकांनी प्रशासनाला आपल्या जीवाची पर्वा न करता सहकार्य केले आहे. पण शिक्षकही आता कोरोना संक्रमणाचे बळी पडत आहेत. अनेक शिक्षकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत सेवा अधिग्रहीत असलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाकडून अतिशय वाईट वागणूक मिळत आहे. सोबतच शिक्षकांना शिस्तभंगाची, निलंबनाची, बडतर्फ करण्याची, वेतनवाढ थांबविण्याची तसेच वेतन कपातीच्या कार्यवाहीची भीतीयुक्त कारणे दाखवा नोटीस बजाविली जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मनात आणखी भीती निर्माण झाली आहे. अशा विदारक परिस्थितीत शिक्षकांना भीतीयुक्त कारणे दाखवा नोटीस पाठविल्यामुळे शिक्षक समुदायात प्रशासनाप्रति नाराजी आहे. शिक्षक नेहमीच प्रशासनाला मदत करतात पण या असाधारण, बिकट व विदारक परिस्थितीत तरी अशाप्रकारे कारणे दाखवा नोटीस देणे तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
- शिक्षकांचे मनोबल खच्ची होते
शिक्षकांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाला सहकार्य केले आहे. शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत. त्या समजून घ्यायला हव्यात. आमची प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे. पण शिक्षकांना अशा धडकी भरविणाऱ्या नोटिशी बजावून शिक्षकांचे मनोबल खच्चीकरण करू नका. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनाची दखल घेतली असल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर यांनी सांगितले.