आधी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, मगच आमच्या जिल्ह्यात या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:26 PM2021-04-22T19:26:38+5:302021-04-22T19:27:49+5:30
Coronavirus in Nagpur news; नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही थैमान घालणे सुरू केले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण प्रचंड वाढला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या व्यतिरिक्त इतर सर्वांना ‘आधी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, नंतरच आमच्या जिल्ह्यात या’, असे सांगितले जात आहे.
शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गेल्या वर्षीही बंदोबस्ताचे आणि उपाययोजनांचे प्रशंसनीय नियोजन केले होते. त्यामुळे शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय कमी होती. या वर्षी मात्र शहराबरोबरच नागपूर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात इस्पितळ आणि आरोग्याच्या उपायोजना तोकड्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित मोठ्या प्रमाणात उपचारासाठी नागपुरात धाव घेत आहेत. परिणामी नागपुरातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती जिल्ह्यात (सार्वजनिक प्रवासी सेवेचा अपवाद वगळता) दाखल होत असेल तर त्याला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नाही त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत केले जात आहे. नागपूर जिल्ह्याला लागून देवलापार आणि केळवद नंतर छिंदवाडा आणि शिवनी हे मध्य प्रदेशातील जिल्हे आहेत. त्यामुळे या सीमांवरची नाकाबंदी अधिकच कडक आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्याशी संबंधित सेवा वगळता अन्य कशाचीही ने-आण करू पाहणाऱ्या वाहनांच्या चालकापासून तो वाहनात बसलेल्या प्रत्येकाला कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्याशिवाय नागपूर जिल्ह्यात प्रवेश दिले जात नाही.
नो मास्कच्या १३ हजार कारवाया
जिल्ह्यातील गावागावात पोलिसांनी समुपदेशन चालवले आहे. गर्दी होऊ नये, यासाठी सर्वच प्रकारच्या दुकानात, खासकरून भाजीबाजारात दुकानदारांना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन केले जाते, अशांवर कारवाई होत आहे. बेशिस्त नागरिकांवर ही पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १३,२५१ नागरिकांवर ‘नो मास्क’ची कारवाई केली आहे. ५ मंगल कार्यालये आणि २० हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे.
---