पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:51 AM2020-05-30T00:51:44+5:302020-05-30T00:54:35+5:30
काम देताना कंत्राटदारावर मेहेरबानी दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काम देताना कंत्राटदारावर मेहेरबानी दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात टंचाईचे काम राबविण्यात येते. दरवर्षी कोट्यवधींचे काम करण्यात येते. यातील बहुतांश काम एकाच कंत्राटदाराकडे जाते. विभागातील अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे हे काम संबंधित कंत्राटदाराला जात असल्याची चर्चा होती. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रकरणात लक्ष घातले. त्यांनाही यात प्राथमिकदृष्ट्या गौडबंगाल असल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांना चौकशी करण्याच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. सात दिवसात याचा सविस्तर खुलासा करण्याचेही आदेश दिले. खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे.