नोटा दुप्पट करण्याची कला दाखवून होतात क्षणात ‘छूमंतर’; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:19 AM2021-09-01T10:19:13+5:302021-09-01T10:19:48+5:30
अनेक व्यावसायिकांना गंडा : अटकेपूर्वी उभी होते वकिलांची फौज
- नरेश डोंगरे
नागपूर : नोटा दुप्पट करण्याची कला अवगत असल्याचा दावा करून अनेकांना कंगाल करणाऱ्या ‘छूमंतर’ टोळीने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे. या टोळीतील दोन सदस्यांना पारडी पोलिसांनी अटक केली. मात्र, या भामट्यांनी हडपलेली रक्कम परत मिळविण्यात यश आले नाही. उलट टोळीच्या पाठीराख्यांनी वकिलांची फौज उभी करून आपल्या नेटवर्कचा पोलिसांना परिचय दिला.
टोळीचे मुख्यालय पश्चिम बंगालमध्ये २४ परगणा जिल्ह्यात आहे. व्यवसायात जम असलेल्यांसोबत या टोळीचे सदस्य व्यावसायिक संबंध निर्माण करतात. एक-दोन व्यवहार झाल्यानंतर रक्कम दुप्पट करून देण्याचे जाळे टाकतात. पाचशेच्या दोन-चार नोटा हातचलाखीने दुप्पट करूनही दाखवतात. त्यामुळे विश्वास बसल्याने अनेक जण स्वतःसोबतच ओळखीच्या व्यक्तींचे लाखो रुपये दुप्पट करून देण्यासाठी या भामट्यांना घरी बोलावत. त्यांच्याकडच्या लाखोच्या नोटा ताब्यात घेत भामटे लक्ष विचलित करतात व रोकड पिशवीत टाकतात आणि गरम पाण्यात नोटांसारखे दिसणारे कागदाचे बंडल टाकून त्यावर विशिष्ट रसायन घालतात. पाण्याचा रंग बदलल्यानंतर तीन ते चार तासांनंतर रक्कम काढून घ्या, अशी थाप मारून पसार होतात.
जेथे भामटे, तेथे वकील
देशातील विविध प्रांतात अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्यानंतर हे भामटे त्यांच्या घरी काही दिवसांसाठी मुक्कामाला जातात.
चुकून कुण्या शहरातील पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर त्यांना तिथल्या तिथे सोडवून घेण्यासाठी त्यांची वकील मंडळी सज्ज असते. कोर्टात जामीन मिळाला नाही तर पोलीस आणि आरोपींच्या पाठोपाठ ही वकील मंडळी संबंधित शहरात पोहोचते.
प्रवासासाठी हजारो खर्च
लाखोंची रक्कम हाती लागल्यामुळे झटपट पळून जाण्यासाठी ते कधी विमानाचा तर कधी खासगी वाहनाचा वापर करतात. नागपुरातून शाहू आणि डायरे नामक व्यापाऱ्यांकडून चार लाख लुटल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्यासाठी या टोळीने नागपूर ते बिलासपूरसाठी २० हजारांची आणि नंतर कोलकाता येथे पळून जाण्यासाठी २० हजारांची आलिशान टॅक्सी केल्याचे उघड झाले आहे.
‘पीसीआर’मध्ये टाईमपास
पीसीआर मिळाला तरी या टोळीचे सदस्य दर दिवशी छातीत दुखणे, हार्टबीट वाढल्याची तक्रार करून वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली टाईमपास करतात आणि पोलिसांचा मार चुकवितात. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी सुमित घोष आणि इदरीस खान या दोघांनी सात दिवसांच्या पीसीआरमध्ये असाच टाईमपास केला अन् न्यायालयीन कोठडीत पोहोचले.