चामुंडी स्फोटातील जखमी मरस्कोल्हे पाठोपाठ श्रद्धा पाटीलचाही मृत्यू; तिसऱ्या दिवशीही धामना गाव शोकातच
By नरेश डोंगरे | Published: June 15, 2024 09:18 PM2024-06-15T21:18:18+5:302024-06-15T21:19:32+5:30
मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
नरेश डोंगरे
धामना, नागपूर : तब्बल ४८ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर श्रद्धा वनराज पाटील (वय २२) या तरुणीने काळापुढे हात टेकले. डॉक्टरांनी तिला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मृत घोषित केले. तिच्या मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत गुरूवारी, १३ जूनला दुपारी भीषण स्फोट झाल्यामुळे प्रांजली किसनाजी मोंदरे (वय २२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५) आणि शीतल आशिष चटप (३०) या पाच तसेच पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी) अशा सहा जणांचा करूण अंत झाला. तर दानसा मरस्कोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश), श्रद्धा वनराज पाटील (२२, रा. धामना) आणि प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) या तिघांवर रवीनगर चाैकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही शरीरात अत्यंत गंभीर जखमा असल्याने दानसा मरस्कोल्हे याने शुक्रवारी रात्री तर श्रद्धा वनकर हिने शनिवारी दुपारी प्राण सोडला.
तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम अन्...
विशेष म्हणजे, प्रांजली, वैशाली, प्राची, मोनाली आणि शीतल या पाच जणींवर शुक्रवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाची पूजा आणि कार्यक्रम आज धामना गावात सुरू होता. तेवढ्यात श्रद्धा वनकरच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकले अन् गावावरची शोककळा अधिकच गडद झाली. भावविवश गावकऱ्यांनी श्रद्धावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त धामना गावात आणि कंपनी परिसरात लावण्यात आला आहे.
प्रमोदची प्रकृती चिंताजनक
या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद चवारे (वय २५, रा. नेरी) या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात असल्याचे डॉ. पिनाक दंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, दानसा मरस्कोल्हे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी रात्रीच त्याच्या मध्य प्रदेशातील गावाकडे रवाना करण्यात आला. यावेळी त्याचे आई-वडील आणि नात्यातील एक तरुण सोबत होता, असेही डॉ. दंदे यांनी सांगितले.