महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्रावण हर्डीकरांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 08:11 PM2023-07-28T20:11:28+5:302023-07-28T20:11:43+5:30
महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे.
आनंद डेकाटे
नागपूर: महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे. डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा कार्यकाळ संपल्याने या पदाचा पदभार अर्थखात्याचे अतिरिक्त सचिव नितीन करीर यांच्याकडे होता. त्यांच्या नियुक्तीचे आदेश २८ जुलै रोजी काढण्यात आले. हर्डीकर सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांना तातडीने त्यांच्या पदाची सुत्रे अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नागपूरमध्ये महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत.
२००५ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असलेले श्रावण हर्डीकर हे ६ जानेवारी २०१५ ते २५ एप्रिल २०१७ या दरम्यान नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. महापालिकेचे आयुक्त हे महामेट्रोचे पदसिद्ध संचालक असतात. त्यामुळे त्यांना मेट्रोच्या कामाची माहिती आहे. मेट्रो टप्पा -२ चे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे त्यांच्यापुढे लक्ष्य असणार आहे. मे २०२३ मध्ये ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोडला होता. महामेट्रोच्या कामाबाबत महालेखाकार यांच्या अहवालात ताशेरे ओढले होते.
त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊ नये,असे पत्र काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठवले होते. दीक्षित यांच्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता राज्य शासाने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्थखात्याचे अतिरिक्त सचिव नितीन करीर यांच्याकडे सोपवला होता. तेव्हापासून मेट्रोची सुत्रे मुंबईतूनच हलविली जात होती. त्यामुळे मेट्रोला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक मिळणार किंवा नाही याबाबत उत्सूकता होती. दीक्षित यांच्या जागी भारतीय रेल्वे सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. पण शासनाने हर्डीकर यांच्या रुपात सनदी अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे.