आमदार-खासदारांचा श्रावण ‘ट्विटर’, ‘फेसबुक’वरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:36+5:302021-09-02T04:19:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एरवी श्रावण महिना किंवा सणासुदीचे दिवस म्हटले की राजकीय पक्षांसाठी जनतेशी थेट संपर्काची मोठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी श्रावण महिना किंवा सणासुदीचे दिवस म्हटले की राजकीय पक्षांसाठी जनतेशी थेट संपर्काची मोठी संधीच असते. मात्र ‘कोरोना’मुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जनसंपर्क व प्रचाराची नेत्यांची संधी हुकली आहे. असे असले तरी शहरातील बहुतांश आमदार-खासदार ‘सोशल मीडिया’तून शुभेच्छा देण्यावर भर देत आहेत. त्यांचा श्रावण ‘ट्विटर’, ‘फेसबुक’वरच जोमात असल्याचे चित्र आहे.
अगदी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच या शुभेच्छांना सुरुवात झाली. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीदेखील शुभेच्छांचा वर्षाव झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी तर अनेकांनी कौटुंबिक व सामाजिक रक्षाबंधनाच्या छायाचित्रांच्यादेखील ‘पोस्ट’ केल्या.
फेसबुकवरच यांचा श्रावण
देवेंद्र फडणवीस (आमदार-दक्षिण पश्चिम नागपूर)
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रावणातील सर्वच महत्त्वाच्या मुहूर्तांच्या ‘फेसबुक’, ‘ट्विटर’वरून सर्वांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडीच्या निमित्ताने सर्वांवर आरोग्याचे अमृत वर्षावे ही त्यांची शुभेच्छा अनेकांचे लक्ष वेधणारी ठरली.
मोहन मते (आमदार-दक्षिण नागपूर)
फेसबुकवर सक्रिय असलेले आ.मोहन मते यांनी श्रावण मासारंभ, नागपंचमी, रक्षाबंधन व जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कृष्णा खोपडे (आमदार-पूर्व नागपूर)
कृष्णा खोपडे यांनी ‘फेसबुक’वर जन्माष्टमी तसेच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र मोहरम, श्रावण मासारंभ, नागपंचमीसंदर्भात त्यांची ‘पोस्ट’ दिसली नाही.
विकास कुंभारे ( आमदार- मध्य नागपूर)
विकास कुंभारे यांनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून पतेती, जन्माष्टमी, रक्षाबंधन, नागपंचमी व श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु रक्षाबंधनाबाबत त्यांनी कौटुंबिक किंवा सामाजिक छायाचित्र पोस्ट केले नाही.
विकास ठाकरे ( आमदार- पश्चिम नागपूर)
विकास ठाकरे यांनी ‘फेसबुक’वर ‘पोस्ट’ केलेली नाही. मात्र ‘ट्विटर’वर त्यांनी रक्षाबंधन, जन्माष्टमी, पतेती, नागपंचमी, यांच्या शुभेच्छा दिल्या. श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा व रक्षाबंधनासंबंधातील छायाचित्र दिसले नाही.
नितीन राऊत (आमदार - उत्तर नागपूर)
ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पतेती, रक्षाबंधनाच्या ‘फेसबुक’वरून शुभेच्छा दिल्या. मात्र दररोज ‘सोशल मीडिया’वर सक्रिय असूनदेखील श्रावणातील इतर सणांच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या नाहीत.
खासदारही ट्विटरवर ॲक्टिव्ह
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ‘ट्विटर’ व ‘फेसबुक’वर सक्रिय असतात. त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशीचा व्हिडिओ ‘पोस्ट’ केला. याशिवाय सर्वच महत्त्वाचे सण व तसेच मुहूर्तांच्या शुभेच्छा देण्यात आघाडी घेतली होती. त्यांच्या ‘पोस्ट’ ‘रिट्विट’ करणाºयांचीदेखील मोठी संख्या होती.