नागपुरात श्रावण सोमवारी मान्सून पावला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:03 AM2018-08-21T00:03:49+5:302018-08-21T00:11:14+5:30
तब्बल महिनाभर दडी मारलेल्या पावसाने रविवार सायंकाळपासून शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. सोमवारी दमदार हजेरी लावत पाऊस मुक्कामी दाखल झाला आहे. पावसाचा जोर आणखी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोमवारी नागपुरात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून धान, सोयाबीन, कापूस पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नागपुरात सकाळी ८.३० वाजेपर्यंत ११.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल महिनाभर दडी मारलेल्या पावसाने रविवार सायंकाळपासून शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. सोमवारी दमदार हजेरी लावत पाऊस मुक्कामी दाखल झाला आहे. पावसाचा जोर आणखी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोमवारी नागपुरात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून धान, सोयाबीन, कापूस पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नागपुरात सकाळी ८.३० वाजेपर्यंत ११.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान विभागातर्फे पूर्ण मध्य भारतात सोमवारी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो बहुतांश प्रमाणात खरा ठरला. मंगळवारीसुद्धा विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी पावसाबाबत ‘रेड अलर्ट’जारी केले होते. मंगळवारीसुद्धा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात सर्वत्रच जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. सोेमवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत मौैदा मंडळात ७५.०२ मि.मी, खात ५८.०२ मि.मी., कोदामेंढी १५३.०२ मि.मी., चाचेर ७८.०२ मि.मी., निमखेडा ७०.०२ मि.मी. आणि धानला येथे ६२.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी ८२.०९ मि.मी.पावसाची नोंद झाली. कोराडी, खापरखेडा येथे दुपारी २ नंतर पावसाचा जोर वाढला तो सायंकाळी ७ वाजेपर्यंत कायम होता. भिवापूर, कुही, मांढळ, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, हिंगणा, वाडी येथेही पावसाने दमदार हजेरी लावली.
गेल्या महिना दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जमिनीला भेगा पडायला लागल्या होत्या. जून महिन्यात आलेल्या पावसाच्या भरवशावर धान पीक शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली होती. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने धान पीक पिवळे पडायला लागले होते. शेतातील जमिनीला तडेही जायला लागले होते. काही ठिकाणी रोवणी न झाल्याने पावसाची प्रतीक्षा होती. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विशेषत: पाण्याचे पीक म्हणून ओळखले जाणाºया धान पिकासाठी तर हा पाऊस अमृततुल्य ठरला आहे.
सांड नदीला पूर, बससेवा ठप्प
मौदा तालुक्यातील तारसा शिवारात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दमदार पावसामुळे परिसरातून वाहणारी सांड नदी दुथळी भरून वाहत असून, कोणत्याही क्षणी नदीचे पाणी तारसा गावात शिरण्याची शक्यता आहे. नदीपात्राजवळील घरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारसाजवळील रस्त्यावर पाणी वाहत असून मार्ग रहदारीकरिता बंद झाला आहे. तसेच निमखेडा-पारडी-खापरखेडा(तेली)-आरोली, निमखेडा-तरोडी-आरोली, राजोली-कोंढामेंढी, नांदगाव-खर्डा -रेवराल,खात-धर्मपुरी यासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. त्याचप्रमाणे खापरखेडा (तेली ) या गावातील टोलीवरील घरात पाणी शिरले आहे. या गावातून दोन नाले वाहतात. रामटेक आगारकडून पुरवल्या जाणारी बससेवा मौदा मार्गावर पूर्णपणे ठप्प झाली असून, रामटेक व मौदा बसस्थानकावर अनेक विद्यार्थी बसचा प्रतीक्षेत उभे असल्याचे बघायला मिळाले.
धरणसाठा वाढणार
नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार केल्यास धरणांमध्ये २० आॅगस्ट रोजी केवळ ३५.२९ टक्के इतकाच जलसाठा होता. परंतु सोमवारी आलेल्या पावसामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात निश्चित वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकºयांसह सर्वत्रच हर्ष व्यक्त होत आहे.
विभागातीत तीन तालुक्यात अतिवृष्टी
विभागात मागील २४ तासात गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोलीतील मुलचेरा १५६ व भामरागड १२५.४० आणि नागपुरातील उमरेड तालुक्यात ७०.२० मि.मी. झाली आहे. विभागात सरासरी १७.०३ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विभागात सोमवारी सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडेवारी १ जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.
गडचिरोली ५१.१८ (१०३९.७२), चंद्र्रपूर १७.३५ (८६५.८९), नागपूर १५.१८ (७४०.५६), भंडारा १०.६६ (७५१.२९), वर्धा ५.०३ (५५०.८५) तर गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी २.७९ (७८६.४१) इतका पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
नागपूर विभागात १ जून २०१८ ते २० आॅगस्ट २०१८ पर्यंत सरासरी ७८९.१२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.