श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळ : ३४ कोटींच्या नव्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:25 PM2018-10-03T21:25:44+5:302018-10-03T21:30:11+5:30
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत झाली.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव ऊर्जा अरविंद सिंह, मुख्य सचिव डी.के.जैन, एमएमआरडीए चे वरिष्ठ अधिकारी, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या प्रस्तावित नवीन कामांना शिखर समितीने मंजुरी दिली. नवीन कामांमध्ये महाद्वार बांधकाम, राममंदिर सभागृह बांधकाम, हनुमान मंदिर सभागृह बांधकाम, उपाहार गृह बांधकाम, मुला-मुलींकरिता इनडोअर गेम स्थळाचे बांधकाम, नागपूर सावनेर रस्त्यापासून कोराडी महालक्ष्मी मंदिर पोचमार्ग बांधकाम, आकस्मिक खर्च, प्रकल्प सल्लागार शुल्क, देखरेख शुल्क, गुणवत्ता तपासणी शुल्क या कामांचा समावेश आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या तीर्थस्थळ विकास प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मंजुरी १८५ कोटींची असून सुधारित प्रशासकीय मंजुरी १३४.३८ कोटींची आहे. दुसरी प्रशासकीय मंजुरी २४.७५ कोटींची मिळाली असून एकूण १८९.१३ कोटी मध्ये शासनाचा वाटा १५१.३४ कोटींचा तर नासुप्रचा वाटा ३७.८० कोटींचा आहे.
या प्रकल्पात समाविष्ट एकूण १२ कामे आहेत. त्यात आवार भिंत, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बस स्टॉप, वाहनतळ, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर, पुजारी निवास, भक्त निवास, विद्युतीकरण, पाणीपुरवठ्याची कामे, कुकिंग शेड, अंतर्गत रस्ते, विस्तारीत आवार भिंत (नवीन) व सभागृह या कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ६८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ६७.६९ कोटी खर्च झालेले आहेत. आवार भिंतीचे काम सुरू आहे. व्यापारी संकुलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भक्त निवासाचे अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. ज्योतीभवन इमारतीचे पहिल्या मजलाचे काम आरसीसी पूर्ण झाले. वाहनतळाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. बस स्थानकाच्या तीन इमारतीच्या आरसीसीचे काम पूर्ण झाले आहे. पर्यटक म्युझियम इमारत व थ्रीडी, फोर डी व सेव्हन डी थिएटरचे काम सुरू आहे. कुकिंग शेड इमारतीचे लोखंडी छताचे काम प्रगतिपथावर आहे, मुख्य मंदिर सभागृहाचे काम सुरू आहे.