श्रीराम आणि अयोध्येतील मंदिराच्या नाण्यांची धूम; लाकडी प्रतिकृती विक्रीस
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 9, 2024 07:30 PM2024-01-09T19:30:10+5:302024-01-09T19:30:40+5:30
भक्तांची मोठ्या प्रमाणात खरेदी : श्रीरामाच्या सोने-चांदीच्या फ्रेम, कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी
नागपूर : अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या निमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. श्रीरामाची प्रतिकृती असलेले वस्त्र तयार करण्यात येत आहेत तर पूजेसाठी उपयोगात येणाऱ्या सामग्रीची रेलचेल दिसून येत आहे. अर्थात नागपुरातील सर्वच बाजारपेठा राममय झाल्या आहेत. २२ जानेवारी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्याचा लोकांचा मानस आहे. या निमित्ताने भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
बाजारात श्रीराम मंदिराचे लाकडी मॉडेल विक्रीस असून सोने-चांदीचे नाणे, फ्रेम, मूर्ती, धनुष्य विक्रीस असून भक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. चांदीच्या एका बाजूला श्री रामाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या मॉडेल तयार केले आहे. याशिवाय श्री रामाचे लॉकेट, अंगठी आदींसह अन्य वस्तूही सराफांकडे विक्रीस आहेत. श्री रामाची प्रतिकृती असलेले सोने आणि चांदीच्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. चांदीचे नाणे एक हजार ते १० हजार आणि सोन्याचे नाणे, फ्रेम व अन्य वस्तू ५ हजार ते ५ लाखांपर्यंत विक्रीस आहेत. याशिवाय श्रीराम-सीतेची प्रतिकृती असलेले अलंकार मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.
भेटवस्तूंनाही मोठी मागणी
भगवान श्रीराम-सीता, लक्ष्मण, पवनसूत हनुमानची प्रतिकृती असलेल्या फ्रेम, श्रीरामाच्या पादुका, मंदिराचे चांदीचे मॉडेलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वजनानुसार मॉडेलची किंमत आहे. तसेच रामदरबारची प्रतिकृती असलेले सोने-चांदीचे नाणे उपलब्ध आहेत.
राममंदिराच्या नाण्यांची मागणी वाढली
आधी दसरा-दिवाळीत भेटस्वरुपात श्रीगणेश आणि लक्ष्मीचे नाणे देण्यात येत होते. पण आता अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने लोकांमध्ये श्रीराम आणि मंदिराची प्रतिकृती असलेले सोने आणि चांदीचे नाणे भेटस्वरुपात देण्याची चलन वाढली आहे. २२ जानेवारीपर्यंत नाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे अनेकांनी आधीच बुकिंग केल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले.
मंदिराचे लाकडी मॉडेल
फर्निचर व्यावसायिकांनी मंदिराचे लाकडी मॉडेल विक्रीस आणले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, पण २२ जानेवारीपर्यंत बाजारात सर्वत्र उपलब्ध होतील, असे व्यावसायिक म्हणाले. लाकडी मंदिराचे ऑर्डर वाढले आहेत. लहानमोठ्या लाकडी मंदिराच्या मागणीत वाढ झाली आहे.
अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार असल्याने सराफा बाजारात प्रचंड उत्साह आहे. नाणे, चेन, लॉकेट, फ्रेम आणि अन्य वस्तूंची भक्तांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसेच भेटवस्तू देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राकडून सोने-चांदीच्या नाण्यांना प्रचंड मागणी आहे. अर्थात सराफा बाजारात श्रीरामाच्या वस्तूंची धूम आहे. बाजार राममय झाला आहे.
राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.