श्रेयस म्हणतो ‘से यस’
By admin | Published: May 29, 2016 02:59 AM2016-05-29T02:59:13+5:302016-05-29T02:59:13+5:30
विद्यार्थीदशेत असताना अनेकांच्या आयुष्याचे ध्येयच निश्चित नसते. परंतु त्याने लहानपणीच स्वत:च्या आयुष्याचे ध्येय ठरविले.
नागपूर : विद्यार्थीदशेत असताना अनेकांच्या आयुष्याचे ध्येयच निश्चित नसते. परंतु त्याने लहानपणीच स्वत:च्या आयुष्याचे ध्येय ठरविले. ध्येय निश्चित असूनदेखील त्याने अभ्यासाचा तणाव कधी घेतला नाही. विविध माध्यमातून जेवढे ज्ञान मिळते तेवढे आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ‘नाही’ हा शब्दच त्याच्या शब्दावलीत नाही. ‘सीबीएसई’ दहावीच्या परीक्षेत विदर्भातून अव्वल स्थान पटकाविलेल्या श्रेयस गाडगे याने ‘से यस’ म्हणण्याच्या त्याच्या भूमिकेतूनच यश अक्षरश: खेचून आणले.
श्रेयस निकालाच्या दिवशी नागपुरात नव्हता. तरीदेखील ‘लोकमत’शी संवाद साधताना त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या यशाच्या वाटचालीबाबत भावना व्यक्त केल्या. गणित व विज्ञानात त्याला विशेष रस असून ‘आॅलिम्पियाड’मध्येदेखील त्याने यश मिळविले. श्रेयसने सर्व गोष्टी सांभाळत अभ्यासाला पुरेपूर वेळ दिला व त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. त्याला ‘आयआयटी’तून अभियांत्रिकीची पदवी घ्यायची असून ‘एअरोस्पेस’मध्ये ‘करिअर’ घडवायचे आहे. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी तो नेहमी उत्साही असतो व अभ्यासासंदर्भातील कुठल्याही गोष्टीला तो नकार देत नाही. त्याचे वडील रवींद्र गाडगे हे व्हीएनआयटीमध्ये अभियंता असून आई प्राजक्ता गृहिणी आहेत. श्रेयस आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना देत असला तरी त्याच्या यशाचे खरे गमक म्हणजे त्याची मेहनतच असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
‘सोशल मीडिया’वर ‘अॅक्टिव्ह’
साधारणत: दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात विद्यार्थी ‘सोशल मीडिया’पासून काहीसे दूरच असतात. परंतु श्रेयस मात्र ‘सोशल मीडिया’वर बऱ्यापैकी ‘अॅक्टिव्ह’ होता. तंत्रज्ञानाच्या युगात जगात काय चालले आहे याची माहिती असणे आवश्यकच आहे. आपण या ‘मीडिया’चा नेमका कसा उपयोग करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून आहेत, असे त्याचे विचार आहेत.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
दहावीच्या वर्षभरात केवळ अभ्यास एके अभ्यास हेच श्रेयसचे धोरण नव्हते. अवांतर वाचन, छंद त्याने जपले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येदेखील त्याला रुची आहे. शाळेतील अनेक नाटकांमध्ये त्याने अभिनय केला आहे, तर विविध कार्यक्रमांचे संचालनदेखील केले आहे. मागील वर्षी त्याने एका मराठी नाटकात काम केले होते व प्रथम पारितोषिक मिळविले होते. याशिवाय ‘इंग्लिश रीड अॅन्ड ग्रो’ या परीक्षेत त्याने नागपुरात पहिला क्रमांक मिळविला. भूगोल ‘आॅलिम्पियाड’मध्ये त्याने रौप्यपदक प्राप्त केले. त्याला ‘सायकलिंग’चीदेखील आवड आहे, अशी माहिती त्याचे काका श्रीकांत गाडगे यांनी दिली.