श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यवधींची उलाढाल
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 21, 2024 08:20 PM2024-01-21T20:20:09+5:302024-01-21T20:20:38+5:30
श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा : शहरात रॅली आणि धार्मिक आयोजन
नागपूर: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरात धार्मिक वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित सर्व प्रकारचे साहित्य आणि सोने-चांदीची मूर्ती, मंदिराची प्रतिकृती आणि नाणे विक्रीतून कोट्यवधींची उलाढाली झाली. या शुभदिनानिमित्त राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. रविवारी अनेकांनी मिठाई आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
झेंडे, दुपट्टे, बिल्ले, टोप्यांची सर्वाधिक विक्री
श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेआधी नागपूर राममय झाले आहे. श्रीरामाचे झेंडे, ध्वज, दुपट्टे, तोरण, लायटिंग, बिल्ले, टोपी, टी-शर्ट आदींसह अन्य वस्तूंची धडाक्यात विक्री होत आहे. इतवारी येथील १०० हून अधिक दुकानदार या साहित्यांची विक्री करीत आहे. नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या या साहित्यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ऑर्डरनुसार पुरवठा करण्यात येत असून भाव दुपटीवर गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ब्रॅण्ड आणि ढोल पथकाचे बुकिंग
सोमवारी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत चौकाचौकातील मंडळांनी ब्रॅण्ड आणि ढोल पथकाचे बुकिंग केले आहे. सर्वांनी दुप्पट दर आकारण्याची माहिती आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा वेळेत ब्रॅण्ड आणि ढोल पथकाला सर्वाधिक मागणी आहे. अनेक मंडळे सकाळी ७ वाजेपासून रॅली काढणार आहे, तर काही ठिकाणी संगीतमय कार्यक्रम होणार आहे. सध्या ब्रॅण्ड पथकाचे दर वाढले आहेत.
रॅलीदरम्यान फोडले फटाके
नागपूरात सर्वच परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले. नागपुरात शनिवार व रविवारी विविध प्रकारच्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. काही फटाक्यांचा तुटवडा जाणवत होता. श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त रविवारी गांधीबाग, इतवारी आणि सक्करदरा चौकात फटाक्यांच्या दुकानात भक्तांची गर्दी होती.
मिठाई खरेदी वाढली
रविवारी सर्वच दुकानांमध्ये मिठाई खरेदीसाठी भक्तांची गर्दी दिसून आली. रविवारी मिठाईसोबतच तिळाचे लाडू सर्वाधिक विकल्या गेल्याचे न्यू राम भंडारचे संचालक वसंत गुप्ता यांनी सांगितले. सोमवारी जास्त मागणी राहील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिठाई तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
सोने-चांदीच्या नाण्यांची सर्वाधिक विक्री
प्राणप्रतिष्ठेनिमित्त नागपूर जिल्ह्यात १० ग्रॅम आणि २० ग्रॅम सोने-चांदीच्या नाण्यांची सर्वाधिक विक्री झाली. जिल्ह्यात ३ हजारांहून अधिक सराफा व्यावसायिक आहे. या सर्वांकडे सोने-चांदीचे नाणे विक्रीस आहे. चांदीचे नाणे सुबक आणि आकर्षक रंगात आहेत. पाहताक्षणी डोळ्यात भरणारे आहेत. प्रत्येक सराफा७ने १०० हून अधिक नाण्यांची विक्री केल्याची माहिती आहे. ऑर्डर दिलेले नाणे सोमवारी घरी नेणार असल्याची माहिती उमरेड येथील अक्षय ज्वेलर्सचे संचालक अक्षय खानोरकर यांनी दिली.