शिक्षक मतदारसंघात श्रीकांत देशपांडे विजयी
By admin | Published: June 26, 2014 12:45 AM2014-06-26T00:45:07+5:302014-06-26T00:45:07+5:30
विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे हे १६ व्या फेरीअखेर विजयी झाले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अपक्ष
अमरावतीत मतांचा कोटा अपूर्ण : १६ व्या फेरीअखेर विजयाची घोषणा
अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे हे १६ व्या फेरीअखेर विजयी झाले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अपक्ष उमेदवार अरुण शेळके यांचा ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला. देशपांडे यांना १२,१०९ तर अरुण शेळके यांना ७,१६७ मते मिळालीत.
एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीतील विजयासाठी १३,०६२ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र एकाही उमेदवाराला मतांचा हा कोटा पूर्ण करता आला नाही. एकूण ४४ हजार ५२६ मतदारांपैकी २७,७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या फेरीत १५३५ मते अवैध ठरली. १०७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.
दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मात्र १६ व्या फेरीअखेर कोणीही उमेदवार निश्चित मतांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. अखेर निवडणूक निरीक्षक सीमा व्यास, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. बनसोड यांनी १६ व्या फेरीअंती निर्माण झालेला पेचप्रसंग राज्य निवडणूक आयोगाला कळविला.
या फेरीअखेर सर्वाधिक मते असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्याबाबत मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास परवानगी मागण्यात आली. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतमोजणी करण्याची तयारीसुद्धा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने १६ व्या फेरीत सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्यांना विजयी घोषित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. बनसोड यांनी शिक्षक आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना विजयी घोषित केले. बनसोड यांच्या हस्ते देशपांडे यांना रात्री १ च्या सुमारास विजयाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव चिमाजी, मतमोजणी पर्यवेक्षक अधिकारी रवींद्र धुरजड हे उपस्थित होते. यावेळी देशपांडे समर्थकांनी एकच जल्लोष केला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पार पडली.
रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने पहिल्या फेरीत १३,०६२ मतांचा कोटा पूर्ण केला नाही. परिणामी दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकासाठी मतमोजणी करण्यात आली.
१५व्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी ११ हजार १५४ मते प्राप्त करून मतांची आघाडी कायम ठेवली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीत ११व्या फेरीअखेर अरुण शेळके यांना ५६८४ तर वसंत खोटरे यांना ४२८७ मते प्राप्त केली होती. शेखर भोयर १६१३, श्रीकृष्ण अवचार १४९१, सुभाष गवई १२१२, प्रकाश तायडे १०६८, संतोष हुशे यांना ९३९ मते प्राप्त केली.
१२व्या फेरीअखेर श्रीकांत देशपांडे ९८४३, अरुण शेळके ५८१४, वसंतराव खोटरे ४४३०, शेखर भोयर १७००, श्रीकृष्ण अवचार १६२१ मते मिळालीत. १३व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना १० हजार १४५, अरुण शेळके ५ हजार ९९६, वसंतराव खोटरे यांना ४५०५ एवढी मते मिळालीत. १४व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना १० हजार ६८८ मते मिळाली. अरुण शेळके ६ हजार १०७ तर वसंतराव खोटरे यांना ४ हजार ६११ मते मिळाला. १५व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना ११ हजार १५४, अरुण शेळके ६ हजार ३५२ व वसंतराव खोटरे यांना ४ हजार ७६८ मते मिळाली.
२२ हजार १२२ वैध मतांपैकी पहिल्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना ८ हजार ७८८, अरुण शेळके ५ हजार ३५१, वसंत खोटरे ४ हजार १६, शेखर भोयर १४६०, गणपत अवचार १३७७, प्रकाश तायडे १००६, सुभाष गवई ११२१, वर्षा निकम ६६६, विजय गुल्हाने ५०६, रामदास बारोटे ६२२, नरहरी अर्डक १५१, अजमल खान ३४, गुलाम अहेमद खान ७८, जयदीश देशमुख १३, सर्जेराव देशमुख ४, रवींद्र मेंढे ५८, संतोष हुसे यांना ८७१ इतकी मते प्राप्त केली.
(प्रतिनिधी)