स्वस्तात भूखंडाचे श्रीखंड, किराणा व्यावसायिकाची एक कोटींनी फसवणूक
By योगेश पांडे | Published: December 5, 2023 07:36 PM2023-12-05T19:36:04+5:302023-12-05T19:36:16+5:30
पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: स्वस्त दरात शहरातील तीन भूखंड लीजवर मिळवून देण्याची बतावणी करत पाच आरोपींनी एका किराणा व्यावसायिकाची एक कोटींहून अधिक रकमेने फसवणूक केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संजय सुखदेव गुप्ता (५४) यांना व्यवसाय विस्तारासाठी भूखंडांची आवश्यकता होती व त्यांनी काही दलालांना तशी कल्पना देऊन ठेवली होती. २०२० साली त्यांच्या ओळखीचे गोपाल भगवान गायकवाड (३७, रहाटे कॉलनी), राहुल हरिचंद्र बाळबुधे (तिरुपती नगर, कोराडी मार्ग), निलेश सुर्यभान चांभारे (४२, गजानन सोसायटी, वाडी, रूपेश महादेव थुटे (३८, शिक्षक काॅलनी, राउत नगर, खरबी) व गोविंद रामाजी वाघमारे (५१,एन.आय.टी. क्वॉर्टर, कमाल टाॅकीज रोड, अषोक नगर) यांनी गुप्ता यांना शहरातील काही भूखंड कमी दरात लीजवर मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
आरोपींनी त्यांना मौजा चिखली देवस्थान, कळमना येथील दोन एकर जमीन, मौजा बाबूळखेडा नरेंद्रनगर येथील ६,६०० चौरस फूट जमीन व मौजा जरिपटका येथील नेल्सन चौकातील १९,२०० चौरस फूट जमीन दाखविली. त्या जमिनी कमी पैशांत लीजवर मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी गुप्ता यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर कधी लीजची प्रक्रिया, टॅक्स, स्टॅंप पेपर, चालान बनविणे, अशा विविध कारणाने रकमा घेतल्या. तसेच नझूल विभागाचे बनावट स्टॅंप व सही असलेले आदेश तयार करून दिले. आरोपींनी गुप्ता यांच्याकडून १.०६ कोटी रुपये उकळले. मात्र कोणतीही जमीन मिळवून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.